राज्यातील स्टार्ट अप उद्योग वाढीसाठी ‘महा-६०’ योजना उपयुक्त – अशोक जॉन…

पीसीसीओई मध्ये ‘महा-६०’ उद्योजकता कार्यशाळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि.५ जानेवारी २०२४) महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढीस चालना मिळावी तसेच स्टार्टप्सला मदत व्हावी या उद्देशाने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने “महा ६०” या योजनेला सुरुवात केली आहे या माध्यमातून एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते यामध्ये दर्जेदार उत्पादन, बाजारपेठेची माहिती संशोधन, नवसंकल्पना, व्यवसाय वाढीस लागणाऱ्या बाबींसाठी मार्गदर्शन केले जाते. शासनाच्या या योजनेचा अधिकाधिक नव उद्योजकांनी प्रशिक्षण घेऊन फायदा घ्यावा असे, आवाहन टॅलेंट इम्पाॅवरमेंटचे संचालक अशोक जॉन यांनी केले.
महाराष्ट्रातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी शासनाच्या उद्योग संचालनालय च्या वतीने राज्यभर ‘महा-६०’ उद्योजकता विकास कार्यशाळा घेण्यात येत आहेत. याअंतर्गत पुणे जिल्हा उद्योग केंद्र व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) वतीने गुरुवारी (दि.४) या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका वृषाली सोने, संदेश कांबळे, नितीन साळवे, सनक दास, विवेक निर्वाणेश्वर, श्रीजीत नायर, पीसीसीओई प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. शीतलकुमार रवंदळे, बी.व्होक विभागाचे प्रमुख डॉ. उमेश पोतदार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या औद्योगिक, आर्थिक विकासाला चालना मिळावी. तसेच अधिकाधिक नवीन उद्योजक तयार व्हायला मदत मिळावी. तसेच उद्योग उभारणीत येणाऱ्या अडचणी वर मात करता यावी, तांत्रिक ज्ञान बाजारपेठेचा शोध, उत्पादनांचा दर्जा, विज्ञान तंत्रज्ञानात होणारे बदल याची माहिती नव उद्योजकांना मिळावी या उद्देशाने महा-६० या प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. पुण्यामध्ये एमएसएमई आणि स्टार्ट अपची संख्या मोठी आहे. पुण्यामध्ये आयटी, फार्मसी, ऑटो या कंपन्यांची संख्या अधिक असल्यामुळे येथील उद्योजकांना याचा अधिक फायदा होईल, असे जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका वृषाली सोने यांनी सांगितले.
महा – ६० प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे व्यवसाय वृद्धी करीता अनेक तांत्रिक बाबींची माहिती मिळाली. व्यवसायाची योग्य दिशा ठरविण्यासाठी मदत झाली. कर्करोगाचे निदान करण्यासाठी संशोधनाद्वारे तयार केलेल्या प्रकल्पास भारत सरकारने मान्यता दिली. या प्रशिक्षणानंतर व्यवसायात मोठी वाढ झाली असे ॲक्टोरिअस इनोव्हेशनचे संचालक अरविंदन वासूदेवन यांनी सांगितले.
आम्ही विकसित केलेल्या मशीनमुळे ग्राहकांना ऊसाचा ताजा, स्वच्छ रस प्यायला मिळतो. पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या ऊसाच्या रसाला नावीन्यपूर्ण प्रयोग करून ग्राहकांसमोर सादर केले. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर केनबॉट मशीन ठेवले होते. तेथे चांगला प्रतिसाद मिळाला. ‘महा -६०’ योजनेत निवड झाल्यानंतर तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या योजनेचा फायदा युवकांनी घ्यावा असे केनबॉटच्या संचालिका किर्ती दातार यांनी सांगितले.
महा – ६० योजनेव्दारे महाराष्ट्रातील गाव खेड्यातील नव उद्योजकांचा शोध घेत प्रोत्साहन दिले जात आहे. संपूर्ण समाजाला उद्योजकता विकासाला चालना देणारा हा उपक्रम आहे. ज्यांच्याकडे नवीन संकल्पना, प्रकल्प सुरू करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तिंनी महा -६० प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन साळवे यांनी केले.
यावेळी सीडबी, आयडीबीआय आदी वित्त संस्थेच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र पुणे व पीसीसीओई यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. रजनी पी. के. यांनी, आभार प्रा. मुबीन तांबोळी यांनी मानले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
@सुजित पोर्टल लिंक दे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *