बांगलादेशी नागरिकांना मतदान ओळखपत्र, रहिवाशी दाखलेकोणी दिले…? आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत मांडला मुद्दा

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव मध्ये आठ बांगलादेशी नागरिकांना गुरुवार दिनांक १४ रोजी दहशतवादी विरोधी पथकाने (ए.टी.एस.) पकडले आहे. त्यांच्यावर नारायणगाव पोलीस स्थानकात बेकायदा घुसखोरी करून भारतात राहील्या बाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज विधानसभेमध्ये जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी बांगलादेशी घुसखोर नागरिकांच्या बाबतचा प्रश्न मांडला या बांगलादेशी नागरिकांकडे मतदार ओळखपत्र रहिवासी दाखला याशिवाय इतर कागदपत्र कशी आली त्यांना ही कागदपत्रे कोणी मिळवून दिली, याबाबतचा प्रश्न आमदार बेनके यांनी विधानसभेत विचारला तसेच या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.
दरम्यान नारायणगाव पोलिसांनी अटक केलेल्या काही बांगलादेशी नागरिकांची नारायणगावच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली आढळून आली असून नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्यांनी मतदान केले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणात नारायणगावच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे यांनी म्हटले आहे. याशिवाय अशा बांगलादेशी नागरिकांना मतदान ओळखपत्र कोणी काढून दिली. तसेच त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड कोणी काढून दिलं त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी खैरे यांनी केली आहे.
याबाबत जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी यांनी मतदार यादीत बांगलादेशी नागरिकांची नावे कशी आली, आधार कार्ड व पॅन कार्ड कशी तयार केली, यासंबंधी माहिती मागविल्यास सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

नारायणगाव येथे गुन्हा दाखल असलेले आरोपींची नावे –

दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुरुवारी दिनांक १४ रोजी नारायणगाव येथे आरोपी १) मेहबुल नजरून शेख, २) राणा जमातअली मंडल ३) गफुर राजेवली शेख ४) आलमगीर जमातअली मंडल ५) शालोम मुस्तफीजुर मंडल ६) अफजल हमिबुल खान ७) कबीर मुज्जाम मुल्ला ८) जमातअली व्हायतअली मंडल (फरार) सर्व सध्या रा. नारायणगाव, पुणे मुळ राहणार बांगलादेश असे सर्व ०८ बांगलादेशी नागरीक कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांगलादेश सिमेवरील मुलकी आधिका-यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून अवैधरित्या वास्तव्य करताना मिळुन आले म्हणुन त्यांचे विरूध्द परकीय नागरीक कायदा १९४६ कलम १४, पारपत्र अधिनियम १९६७ – नियम ३, ६, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरीक आदेश १९५० चे कलम ३ (अ) अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *