कबड्डीचा आता जगभरात डंका – शांताराम जाधव, दिशा सोशल फाउंडेशनकडून स्नेहलचा सत्कार

पिंपरी, पुणे

कबड्डी खेळाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार, प्रसार होण्यासाठी बुवा साळवी, शरद पवार यांनी भरपूर काम केले. या खेळासाठी कित्येकांनी जीवन समर्पित केले. अशा अनेकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच कबड्डीचा आता जगभरात डंका आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, वाढलेला हा खेळ आता ४० पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जात आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या स्नेहल शिंदे – साखरे हिच्या सत्कारामुळे इतर खेळाडूंना विशेषतः महिला खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते शांतारामबापू जाधव यांनी केले.
चीन येथे झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक मिळवल्याबद्दल या संघाची आघाडीची खेळाडू स्नेहल शिंदे – साखरे हिचा गुरुवारी दिशा सोशल फाउंडेशन च्या वतीने शांतारामबापू जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राधिकरणातील ‘ब्रह्मा’ येथे झालेल्या या समारंभास ज्येष्ठ कबड्डीपटू सचिन साठे, दिशाचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ नाना शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, क्रीडापटू राजेश सावंत, स्नेहलचे पती सागर साखरे व इतर कुटुंबिय उपस्थित होते.
यावेळी जाधव म्हणाले की, कबड्डी खेळणे म्हणजे स्वतःला दुखापत करून घेणे, वेळेचा अपव्यय करणे असा नकारात्मक सूर बराच काळ होता. आता मात्र हाच कबड्डीचा खेळ आता जागतिक पातळीवर खेळला जात आहे. कबड्डीचे तथा कबड्डीच्या खेळाडूंचे महत्त्व कित्येक पटीने वाढले आहे. एखाद्या खेळाडूला करिअर करण्यासाठी लहानपणापासूनच दहा-बारा वर्षे परिश्रम करावे लागतात. आई, वडिलांसह क्रीडा मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम, सराव केला तर या क्षेत्रात नाव कमावता येते. पण खेळाडूमध्ये आव्हाने पेलण्याची क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ज्याप्रमाणे स्नेहलला कुटुंबातून पाठबळ मिळाले तसे इतर खेळाडूंना देखील मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी शांताराम जाधव यांनी व्यक्त केली.
प्रास्तविक जगन्नाथ शिवले, स्वागत संतोष निंबाळकर यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.
चौकट
…म्हणून देशाचे प्रतिनिधीत्व करता आले
माझे वडील प्रदीप शिंदे यांचे खेळावर खूप प्रेम आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करावे, हे त्यांचे स्वप्न होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. माझ्या आई, वडिलांबरोबरच माझे पती, सासू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच मला कबड्डीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आले. अशा हृद्य सत्कारामुळे खेळाडूंचे मनोबल वाढते. माझ्या पाठीवर पडलेली ही कौतुकाची थाप कायम मला प्रेरणादायी ठरेल, अशी भावना स्नेहल शिंदे – साखरे हिने यावेळी बोलताना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *