कृषी विकासाला ‘मात्रा’ आधुनिक तंत्रज्ञानाची – डॉ. प्रशांत पाटील
पिंपरी, पुणे (दि. २ सप्टेंबर २०२३)
वाढते शहरीकरण, मर्यादित जमीन, पाणी, वातावरण बदल, शेतमजूरांची घटती संख्या या बाबींचा विचार केला तर कृषी क्षेत्रास पुढील २५ वर्षे आव्हानात्मक आहेत. लागवडीखालील शेत जमिनीतून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे मत राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
पीसीईटीच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च मध्ये ‘एशियाकॉन – २३’ या ‘एशियन कॉन्फरन्स ऑन इनोव्हेशन इन टेक्नॉलॉजी’ या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमन डे, नागार्जुन कॉलेज बेंगलोरचे डॉ. अजय द्विवेदी, आयईईई तांत्रिक सल्लागार चाणक्य कुमार झा,पीसीसीओईआर प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रा. डॉ. राहुल मापारी उपस्थित होते. यावेळी ‘एशियाकॉन’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. पाटील म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताचे शेती लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. परंतु त्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन होत नाही. पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती, तंत्रज्ञानाचा अत्यल्प वापर अशा काही उणीवा यामध्ये आहेत. परंतु शेती विकासात रोबोटिक तंत्रज्ञान, औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढला तर वेळे आणि पैशाची बचत होऊन चांगले उत्पादन मिळेल. यासाठी कम्प्युटर सायन्स, आयटी, रोबोटिक सायन्स सह अभियांत्रिकी मधील इतर शाखेतील अभियंत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर कृषी विकासाला अधिक चालना आणि उत्पादनात वाढ होऊन देशाच्या जीडीपीमध्ये भर पडेल
मिळेल.
डॉ. हरीश तिवारी आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. नवीन संशोधन समाज उन्नतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. अभियंते आधुनिक जगाचे नवनिर्माण करणारे आहेत.
डॉ. राहुल मापारी यांनी परिषदेचा आढावा घेतला. चाणक्य कुमार झा, सुमन डे, डॉ. अजय द्विवेदी यांनीही मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली
आयोजित केलेल्या या परिषदेत भारतासह ५४ देशातून १४०० प्रवेशिका आल्या. त्यापैकी ३३२ शोध निबंधांची निवड करण्यात आली.