हिवरे तर्फे नारायणगाव येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

नारायणगाव :- ( किरण वाजगे, कार्यकारी संपादक )
हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील देवाची जाळी मांजरवाडी सीमेवर दौलत खंडागळे यांच्या पाळीव जनावरांच्या गोठ्याजवळ एका नर बिबट्याला जेरबंद करण्यात जुन्नर वनविभागाला यश आले आहे.
दरम्यान नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर काही वेळातच तेथे त्याच्या सहवासात असलेली मादी जणू विरहामुळे पिंजऱ्याच्या बाहेर नर बिबट्याची वाट पाहताना चे दृश्य पहायला मिळाले या प्रसंगाचे फोटो देखील खंडागळे यांनी काढले असून या मातीला खुशखवून लावण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी फटाके वाजवून मादीला पिटाळून लावले.
गेले अनेक दिवसापासून हा बिबट्या रोज रात्री या परिसरात येऊन अनेक जनावरे फस्त करत होता. याबाबतची तक्रार दौलत खंडागळे यांनी वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, वनपाल अनिता होले यांना दिली होती. त्यानुसार सोमवारी दि. ७ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास येथे लावलेल्या पिंजऱ्यात हा नर बिबट्या जेरबंद झाला. या बिबट्याला जरबंद करण्यासाठी वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, दर्शन खंडागळे, राम चोपडा, पोलीस पाटील सचिन टावरे, तसेच नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, भरत मुठे, अक्षय मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
मांजरवाडीच्या सरपंच मनीषा मुळे, पंचायत समितीचे माजी सदस्य व शिवसेना (उद्धव ठाकरे) तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. या बिबट्याला पुढील देखभाल व उपचाराकरिता माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *