३० डिसेंबर २०२२
मुंबई पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न केला होता. यावेळी शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. सध्या पालिकेतील सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. सेनाभवन शिंदे गटाच्या ताब्यात घेणार असल्याचा दावा शिंदेगटाकडून केला जात आहे. त्यावरूनही संजय राऊत यांनी भाष्य केले.
हिंमत असेल तर स्वत:चं काही निर्माण करा. ते शिवसेना पक्ष, बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते असल्याचे सांगत आहेत. तसेच शिवसेना पक्षाची कार्यालयेदेखील आमचीच आहेत, असे म्हणत आहेत. मग तुम्ही काय केले? स्वतः च्या मुलांना जन्म द्या दुसऱ्यांची मुले खेळवू नका,अशी टीका राऊतांनी केली.
संजय राऊत यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरही भाष्य केले. बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होत आहे? तेथील सरकार, कानडी संघटना मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. तिथल्या सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने सीमाप्रश्नी ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत. मात्र हा आदेश पाळला जात नाही. म्हणूनच हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी केली जात आहे,असे संजय राऊत म्हणाले.