फेरीवाला सर्वेक्षणाला १० जानेवारी पर्यंत मुदतवाढ

दि .३०/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील फेरीवाला सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या पथविक्रेत्यांना फेरीवाला सर्वेक्षणामध्ये सहभागी करून घेण्यासाठी दि. १० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदणी करण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण दि. १ नोव्हेंबर २०२२ पासून शासनाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये करण्यात येत आहे. फेरीवाला सर्वेक्षण करण्याची मुदत प्रारंभी १ डिसेंबर २०२२ पर्यंत होती. त्यामध्ये बदल करून दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सर्वेक्षणासाठी मुदत देण्यात आली होती. महापालिकेच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन फेरीवाला सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या फेरीवाल्यांना आता १० जानेवारी २०२३ पर्यंत प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयात जाऊन आपली नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यमान पथविक्रेत्यांसह सर्व पथ विक्रेत्यांनी दि. १ जानेवारी २०२३ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये अर्ज सादर करावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या कालावधी नंतर आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच अर्ज केल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर असणा-या पथ विक्रेत्यांच्या सर्वेक्षणाबाबतची नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *