अजित पवार वेळप्रसंगी मोबाईल बंद करून पळून जातात,अंडरग्राऊंड होतात, कधी रडतात; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

२८ डिसेंबर २०२२


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधासभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. मी दाव्यानं सांगतो की बारामती शहर सोडता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे.

बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे. माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल.

अजित पवारांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. अजित पवार आम्हाला माहिती आहे की वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात. अंडरग्राऊंड होतात. कधी रडतात. असे अजित पवार बघितले आहेत आम्ही. त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात आम्हाला आव्हान देऊ नये. त्यांचं कोणतंही, कोणत्याही पातळीवरचं आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे इथून पुढे नागपुरात अजित पवारांनी अशी भाषा करू नये,असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *