पुरवठादाराची सुरक्षा ठेव जप्त केल्याने पालिकेला नोटीस

१६ डिसेंबर २०२२

पिंपरी


केंद्र शासनाच्या जेम पोर्टलच्या (गर्व्हमेंट ई मार्केटप्लेस-जीईएम) निविदाप्रक्रियेत पात्र पुरवठादाराने कागदाचा पुरवठा मुदतीमध्ये न केल्याने त्याची दीड लाखाची सुरक्षा ठेव जप्त करण्यात आली आहे. या नियमाबाह्य कारवाईसंदर्भात संबंधित पुरवठादाराने तक्रार केल्याने जेम पोर्टल विभागाने महापालिकेस कारणा दाखवा नोटीस बजावली आहे.

पालिकेच्या विविध विभागांसाठी कागद पुरवठा करण्यासाठी पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने जेम पोर्टलवर निविदा प्रसिद्ध केली होती. जेम पोर्टलवर ऑनलाइन निविदा प्रसिद्ध केल्यानंतर सर्व नियम केंद्र शासनाचे लागू होतात. त्यानंतर वेगळे अतिरिक्त नियम व अटी तसेच, करारनामा करण्याची आवश्यकता नसते. मात्र, पालिका प्रशासन आपल्याला सोईस्कर असलेल्या अतिरिक्त नियम व अटी निविदेसाठी लागू करते. तसेच, करारनामा करून घेते. दरम्यान, ठरलेल्या मुदतीमध्ये कागदाचा पुरवठा न केल्याने पालिकेने संबंधित पुरवठादारांची दीड लाखाची सुरक्षा ठेव जप्त केली आहे.

या नियमबाह्य कारवाईच्या विरोधात पुरवठादाराने जेम पोर्टलकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन जेम पोर्टल विभागाने पालिकेस कारणा दाखवा नोटीस बजावली आहे. पालिका प्रशासन आपल्या आवश्यकतेनुसार आणि मर्जीतील ठेकेदार व पुरवठादार नेमण्यासाठी केंद्र शासनाचे जेम पोर्टल आणि राज्य शासनाचे महा-ई पोर्टलवर निविदा प्रसिद्ध करते. त्याला आवश्यकतेनुसार पालिकेचे अतिरिक्त नियम व अटी जोडल्या जातात. त्यामुळे मर्जीत नसलेल्या ठेकेदार व पुरवठादारांना विविध कारणे पुढे करून अपात्र केले जाते. त्यांच्यावर नाहक कारवाई केली जाते, अशी तक्रार जेम पोर्टल व पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *