शिवसेनाप्रमुखांच्या नावाने बाजार मांडू नका; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

१८ नोव्हेंबर २०२२


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समजण्यासाठी त्यांच्या निधनानंतर दहा वर्षे लागली, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने बाजार मांडू नका, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जाऊन ठाकरे व कुटुंबीयांनी आणि शेकडो शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा आजचा स्मृतीदिन मला वेगळा वाटतो. काही नेत्यांना शिवसेनाप्रमुखांचे विचार त्यांच्या निधनानंतर दहा वर्षांनी समजले. अनेकांना शिवसेनाप्रमुखांविषयी प्रेम आहे व त्यांनी भावना व्यक्त करायलाही हरकत नाही. विचार व्यक्त करताना तशी कृतीही केली पाहिजे. पण तसे करताना शिवसेनाप्रमुखांचा बाजार कोणीही मांडू नये. बाजारूपणा कशातही दिसता कामा नये. कारण विचार व्यक्त करायला कृती असावी लागते. कृतीतूनही विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार विचार राहत नाही. तो बाजार राहतो. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कुणी मांडू नये. त्यांच्या भावना, श्रद्धा, प्रेम समजू शकतो. पण तुम्ही साजेसं काम करा, असा टोला त्यांनी लगावला. भाजपला संपूर्ण देशाचा ताबा हवा आहे. तिथे या स्मारकाचं काय? त्यांना सर्वच आपल्याआपल्या नियंत्रणाखाली घ्यायचे आहे, अशी  टीकाही त्यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *