तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटणार – शरद पवार

२९ डिसेंबर २०२२

पुणे


केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर केला जात आहे. तपास यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकाऱ्यावर जी वेळ आली, ती वेळ आणि यातना अन्य कोणाला सहन कराव्या लागू नयेत, यासाठीही ही भेट असेल,अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

शरद पवार म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा अनिल देशमुखांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल, ही अपेक्षा आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. देशमुख यांच्यावर आधी शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. दोषारोप पत्र ठेवताना ही रक्कम साडेचार कोटी रुपये दाखविण्यात आली आणि अंतिम दोषारोपपत्रात एक कोटी दर्शविण्यात आली. त्यामुळे तपासी यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत.

माजी मंत्री देशमुख यांच्या अटकेने सत्तेचा दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट झाले असून, या अटकेने एका कर्तव्यदक्ष आणि सुसंस्कृत व्यक्तीला तब्बल १३ महिने तुरुंगात टाकण्यात आले. पण न्याय व्यवस्थेने त्या व्यक्तीला आज न्याय दिला आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांचा विचार करायला हवा. आतापर्यंत आमच्या काही सहकाऱ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *