कायद्याची अमलबजावणी न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा – अपना वतन संघटनेची मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१९ ऑगस्ट २०२२

पिंपरी


महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ ची अमलबजावणी न करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी मा. आयुक्त ,पिंपरी चिचंवड महानगरपालिका , मा. अतिरिक्त आयुक्त व मा. सहा . आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिचंवड शहरातील लोकसंख्या जवळपास २० लाखाच्या आसपास आहे. शहरामध्ये संपूर्ण देशातून कामासाठी नागरिक आलेले आहेत. याच ठिकाणी स्थायिक झालेलं आहेत. झोपडपट्टी परिसर , एमआयडीसी मधील कामगार वर्ग , मध्यमवर्ग असा मोठा समुदाय शहरात आहे. शहरामध्ये वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी रुग्णालये तयार झाले आहेत. परंतु काही रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल व आर्थिक पिळवणूक केली जात आहे. महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ ची अंमलबजावणी या रुग्णालयातून होताना दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ प्रमाणे रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्थानिक पर्यवेक्षीय प्राधिकाऱ्याचे आणि तक्रार निवारण कक्षाचे संपर्क क्रमांक असणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह , अतिदक्षता विभाग ,प्रसूतिगृह यांमध्ये शासनाने विहित केलेल्या प्रमाणकांच्या निकषांचे पालन होताना दिसत नाही. अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंगच्या अपुऱ्या सुविधा , अपुरा रक्तसाठा , आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता आढळून येते.

महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ मधील नियम ११ व अनुसूची ३ अनुसार सर्व खासगी रुग्णालये व नर्सिंग होम यांनी १५ सुविधांचा दर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये प्रवेश शुल्क, प्रतिदिन आंतररुग्ण दर ( खाट /अतिदक्षता कक्ष ), वैद्यकीय शुल्क ( प्रति भेट ), सहायक वैद्यकीय शुल्क (प्रति भेट ), भूल शुल्क, शस्त्रक्रिया सहाय्यक शुल्क, भूल सहाय्यक शुल्क, रुग्णालय शुल्क ( प्रतिदिन ), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टिप्यारा शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडिओलॉजी व सोनोग्राफी शुल्क यांचा समावेश होतो. परंतु अनेक रुग्णालयामध्ये हे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेकवेळा रुग्ण दगावल्यानंतर रुग्णालयाकडून मृतदेह ताब्यात देण्यात येत नाही . रुग्णांचा परिवार दुःखात असताना त्यांचा मानसिक छळ केला जातो . अशा अनेक प्रकारे शहरातील रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ चे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. यामुळे अपना वतन संघटनेकडून आपल्याकडे मागणी करण्यात येत आहे कि, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र शुश्रुषागृह ( सुधारित ) नियम २०२१ प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयावर कडक कायदेशीर कारवाई करणेत यावी. अशी मागणी शेख यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *