महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे महिला सुरक्षेतेबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन.

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ सप्टेंबर २०२१ 

पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था पार पाडणा-या पोलिसांकडून विशेषत: तरुणी व महिलांच्या बाबतीत घरगुती हिंसा व इतर दुर्देवी घडणा-या घटनासंबंधी विविध उपाययोजनांसह महिलांशी संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी करावी याबाबतचे निवेदन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले.

यावेळी त्यांचेसोबत उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, भाजपा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गावडे, कविता हिंगे, गीता महेंद्र, शोभा भराडे, आशा काळे, पल्लवी वाल्हेकर, सोनम मोरे, वैशाली जवळकर आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, शहरातील स्रियांच्या बाबतीत घडणा-या दुर्देवी घटना तसेच वाढत्या गुन्हेगारीमुळे तरुणी व महिलामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. शहरातील काम करणा-या महिलांना तसेच विविध कामासाठी वेळी अवेळी घराबाहेर पडावे लागते. नुकत्याच घडलेल्या विविध ठिकाणच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहता गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही असे वाटते. त्यामुळे महिलांशी संबंधित कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.  महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत करावी या करीता संबंधित पोलिस अधिका-यांना सक्त सूचना द्याव्यात अशी विनंती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना केली.

यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महिलांवरील अन्यायासंबंधी जनजागृती करण्यात येणार असून शहरातील महिलांनीही न घाबरता तक्रार केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगितले. काही महिला हया भिती पोटी पोलिसांकडे तक्रार देत नाहीत तरी महिलांनी न घाबरता अन्यायाविरुद्ध तक्रार करावी जेणेकरुन पोलिस प्रशासनाला संबंधितांविरुध्द कडक कारवाई करणे सोईचे होईल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *