निळू फुले – एक समाजशिल्पी अभिनेता..

बातमी : विभागीय संपादक
            रविंद्र खुडे
शिरूर (पुणे) : दि. 13/07/2021

    निळू फुले एक पक्के पुणेकर. घरच्या गरिबीमुळे अनेक लहान मोठी कामे करत मोठा झालेला हा कलावंत. पुण्याच्या आर्मीच्या वैद्यकीय महाविद्यलयात (AFMC)  ११ वर्षे माळी काम केलेले हे अवलिया. पुढे कला क्षेत्रात आनंदाची एवढी सदा सतेज बाग फुलवेल असे कुणाला वाटले तरी असेल का? केवळ अभिनय नाही तर समाज कार्यातही तेवढ्याच तळमळीने सामील होणारा हा कलावंत. त्यांच्या १२ व्या स्मरण दिनानिमित्त (१३ जुलै) ही शब्दांजली !
     अरे वा झकास! पहिला घास खाल्यानंतरच ते उद्गारले. आणि मग शांतपणे जेवले. शेवटी रस्सा पिल्यानंतर पुन्हा म्हणाले खूप दिवसांनी असे जेवलो. फलटणचे मटण ही खासियत आहे, यावर त्यांच्या उद्गाराने शिक्कामोर्तब झाले. सोबत रामदास फुटाणे आणि माझा मित्र प्रशांत कोठडिया होता. मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवात, पुण्याच्या ‘सृष्टी’ या संस्थेत गाजलेला ‘निळूभाऊ फुले जीवन दर्शन’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्त आम्ही फलटणला गेलो होतो. मुलाखत अर्थातच खूप रंगली. फुटाणे आणि प्रशांतने त्यांना बोलते केले. कार्यक्रमाला येताना आणि जाताना, कार्यक्रम संपल्यावर खूप गप्पा झाल्या. यातून निळूभाऊ अधिक उलगडत गेले .
      लहानपणी ‘एक गाव बारा भानगडी’ मधला त्यांचा झेले अण्णा, कळत नकळत मनावर कोरला गेला होता. सेवादलाच्या कलापथकातून आणि लोकनाट्यामधून त्यांच्या अभिनयाचा पिंड पोसला गेला. लोकनाट्यामधून ज्यांच्या अभिनयाचा, नाट्य लेखनाचा, दिग्दर्शनाचा प्रवास सुरु झाला आहे, ती मंडळी रंगमंचावर अनेक उत्तम कलाकृती देतात असा अनुभव आहे. माणसाची नाळ ठाऊक असल्यामुळे, मातीचा रंग नेमका पाहिल्यामुळे त्यांच्या संहिता तगड्या असतात. नट मंडळी रंगमंचावर सहजपणे वावरतात आणि भूमिकांना एक वेगळीच चकाकी देतात. बंगालच्या लोकनाट्यातून, पथनाट्यातून पुढे आलेल्या उत्पल दत्त, शंभू मित्रा, बादल सरकार अशा माणसांनी हे दाखवून दिले आहे.
नाटक – सिनेमांमधून उत्तुंग भूमिका साकारताना, हे नाट्य संस्कार आणि निष्ठा ही पुरचुंडी भाऊंना आयुष्यभर पुरली. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य, ही या गुणी अभिनेत्याची रंगमंचावरची खणखणीत सलामी होती. ‘एक गाव बारा भानगडी’ मध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने रंगवलेला खलनायक लोकांनी उचलून धरला. चित्रपट धो धो चालला खरा, पण या चित्रपटाने या गुणी नटाला तिरक्या टोपीत आणि छद्मी हास्यातच अनेक वर्ष अडकवून ठेवलं. हे मराठी सांस्कृतिक विश्वाचं मोठं नुकसान मानावे लागेल. त्यांनी व्यावसायिक हिंदी चित्रपटात कामे केली. ’कुली’ सारख्या अनेक दे मार चित्रपटातही ते चमकले. पण ते त्यांचे मानस सरोवर कधीच नव्हते.
‘सिंहासन’ मधला दिगू , ‘सामना’ तला हिंदुराव पाटील, ‘सूर्यास्त’ मधला आप्पाजी, ही त्यांच्या अभिनयाची खरी शिखरे आहेत. ‘सखाराम बाईंडर’ मधला सखाराम या गुणी नटानी, कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवला. माणसांमधलं पिसाटलेलं श्वापद काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं. ‘बाई वाड्यावर या’ या त्यांच्या संवादाची भ्रष्ट नक्कल करत, काही रीयालीटीज शोजनी, या गुणी नटाच्या अभिनयाची जातकुळी लक्षात न घेता, कमालीचे अवमूल्यन केले आहे. हा अपवाद सोडता, मराठी रसिकांनी यांचा नेहमीच सन्मान केला आहे. हे गरिबीत वाढले, सर्व थरातील समाजात वावरले. ११ वी पर्यंत शिकलेल्या या माणसाने, बुद्धापासून मार्क्स पर्यंतचे साहित्य उकळून प्यायले. वाचनातून बुद्धीची मशागत केली. सेवाभावी माणसांच्या सहवासात राहून माणूसकीचा पाठ गिरवला. सामाजिक कृतज्ञतानिधी, अंधश्रद्धा निर्मूलन अशा चळवळीत ते नेहमीच अग्रेसर राहिले. या सर्वांची गोळाबेरीज यांच्या अभिव्यक्तीतून, अभिनयातून आपल्या समोर आली, ती सोळा आणे होती त्यात नवल ते काय ?
खडकमाळ आळीतल्या बोराटे वाड्यात राहणारे निळूभाऊ, किसान उजगावकर यांच्या अभिनयाने भारावलेले, १० भावंडांबरोबर वाढलेले, शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये शांताबाई शेळके यांच्याकडून मराठी शिकलेले, भाषा कळत नसूनही मित्रांच्या मदतीने ‘गॉन विथ द विंड’ सारखे इंग्रजी सिनेमे पाहणारे, ‘होळीची पोळी’ या नभोनाट्यात दादा कोंडके या मित्राला सामील करुन घेणारे, सेवादलाच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम यात हिरिरीने भाग घेणारे, कथा अकलेच्या कांद्या मधील भूमिकेबद्दल काशिनाथ घाणेकर, डॉ. लागू यांची दाद मिळवणारे, केवळ ५०० रुपये मानधनात ‘एक गाव बारा भानगडी’ सारखा अजरामर सिनेमा देणारे, ‘बेबी’ या नाटकातील ‘राघव’ ही त्यांची भूमिका पाहून, हिंदीमध्ये ती करणारा नसरुद्दिन शहा म्हणतो की ‘मला आज राघव कळला’ ही भूमिकेची उत्तुंग समज असलेले, सावित्रीबाई फुले यांच्याशी थेट नाते असलेले निळूभाऊ मला त्या रात्री नव्याने समजले.
कधी कोल्हापूर, सांगलीला गेलो की येताना सातारा सोडल्यावर एक होर्डिंग नेहमी लक्ष वेधून घेते. त्यावर निळूभाऊ यांची छबी आहे आणि खाली लिहिले आहे “मोठा माणूस” … याहून कोणता मोठा पुरस्कार असू शकतो हो  !
आज त्यांचा स्मृतिदिन – मृत्यू (१३ जुलै २००९) सलाम  !

शब्दांकन : केशव साठ्ये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *