मुंबई ही आमच्या बापाचीच, मेलो तरी कुणाला नाही देणार – जितेंद्र आव्हाड

२८ डिसेंबर २०२२

नागपुर


कर्नाटकमधून मुंबई आणि महाराष्ट्राबाबत चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी कर्नाटकच्या कायदेमंत्र्यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद आज महाराष्ट्र विधीमंडळातही दिसू लागले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

आम्ही मेलो तरी चालेल, पण मुंबई कुणाला देणार नाही – जितेंद्र आव्हाड

काल कर्नाटकच्या विधीमंडळात मुंबई कर्नाटकचीच आहे, असे नालायक बोम्मईंच्या मंत्रिमंडळातील एक नालायक मंत्री म्हणतो. मग दुसरा मंत्री पुढे येतो आणि म्हणतो की, मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात. हे अर्थाअर्थी खोटं आहे. १०५ हुतात्म्यांनी रक्त वाहिल्यानंतर मुंबईचा नकाशा तयार झाला. आम्ही मेलो तरी चालेल, पण मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी कुणाच्या तरी तोंडातून हे वदवून घ्यायचे. मग देशभर चर्चा घडवून आणायची, असे अजिबात चालणार नाही., अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

बोम्मई यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचे मुंबईवर नितांत प्रेम आहे. कारण मुंबईने मराठी माणसालाच नाही तर प्रत्येक भारतीयाला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. कर्नाटक सरकारने काल जे काही केले, त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना जाब विचारला पाहीजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगूनही वारंवार मराठी माणसाच्या हृदयाला चिमटे काढण्याचे काम कर्नाटकाकडून केलं जात आहे. उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहेच. पण माझी अशी भूमिका आहे, मुख्यमंत्री बोम्मईंना मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडवायची आहे. त्यांची पायाखालची जमीन हललेली आहे. केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन कर्नाटककडून होत आहे. महाराष्ट्र जास्त काळ आपला अपमान सहन करणार नाही. मुंबई ही आमच्या बापाचीच आहे. कुणी कितीही म्हणो आम्ही मेलो तरी चालेल, पण मुंबई कुणाला देणार नाही, असंही आव्हाड म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *