सीमा भागातील वाहनांवरील हल्ले २४ तासांत थांबले नाहीत तर; शरद पवारांचा बोम्मई यांना इशारा

०६ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र ती भूमिका घेतली जात नाही. येत्या २४ तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सीमावादावर भूमिका घेण्याची वेळ आली आहे – शरद पवार

शरद पवार म्हणाले, देशाला ज्यांनी संविधान दिलं. थोर महात्म्याच्या स्मरणाच्या दिवशी जे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण काही आठवड्यापासून एका वेगळ्याच स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी २३ नोव्हेंबरला जत संबंधी भूमिका मांडली. २४ नोव्हेंबरला अक्कलकोटबद्दल बोलले. फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही स्टेटमेंट सातत्याने केले आहेत. सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षांपासून संबंध आहे. हे चित्र घडत असताना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याशी संपर्क साधला म्हणाले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. हे वेळीच थांबलं नाही परिस्थिती चिघळू शकते.

येत्या २४ तासात वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर संयमाला रस्ता पहायला मिळेल, या स्थितीची जबाबदारी कर्नाटक सरकारवर असेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला. अजूनही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका संयमाची आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडूनच चिथावणीखोर भूमिका घेतली जातेय. सहकाऱ्यांकडून हल्ले घडत आहेत. देशाच्या ऐक्याला हा फार मोठा धक्का आहे. हेच काम कर्नाटकातून होत असेल तर केंद्र सराकारला बघ्याची बूमिका घेऊन चालणार नाही, असे शरद पवार म्ङणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *