लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे साहित्य : प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१० ऑगस्ट २०२२

पुणे


महामानव व मातंग समाजाचे प्रेरणास्थान व आराध्य दैवत म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे येथेही दलित स्वयंसेवक संघ व अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, “विश्व साहित्यिक अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दलित स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय, के ब्लॉक, नेहरू स्टेडियम, स्वारगेट, पुणे या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब सोनवणे हे होते.

या व्याख्यानमालेचे ३८५ वे विचारपुष्प, दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी, रयत शिक्षण संस्थेचे निवृत्त प्राचार्य डॉ. पांडुरंग निवृत्ती गायकवाड यांनी गुंफले. विषय होता “अण्णाभाऊ साठे आकलन, प्रेरणा व बोध.” या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले की, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून खऱ्या अर्थाने संघर्षाचे चित्रण आलेले असून, त्यातून दलित, वंचित, बहुजनांच्या वेदनेचे चित्रण केलेले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे साहित्य आहे. अण्णाभाऊंनी शाहू, फुले, आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आपल्या साहित्यातून मांडलेला असून, बहुजन समाजाचे दुःख, वेदना यांना वाचा फोडण्याचे काम देखील खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले असल्याने, त्यांची हीच प्रेरणा समाज बांधवांनी घेण्याची गरज आहे.”


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, “आज आपला मातंग समाज हा शिक्षणापासून व तत्सम सोयी सुविधांपासून दूर व वंचित आहे. म्हणून बहुजनांनी शिक्षणाची कास जोमाने धरली पाहिजे, त्याशिवाय प्रगती होणार नाही.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध क्लोरोनाईट वादक लक्ष्मण रिठे, यांनी देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने “हे मेरे वतन के लोगो” हे गीत वाजवून शहिदांना अभिवादन केले. तर शाहीर सदाशिव भिसे यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. याप्रसंगी अध्यक्ष लक्ष्मण लोंढे, माजी समाज कल्याण अधिकारी अशोक खंदारे, ऍडव्होकेट डॉ. दशरथ औचारे, सुभा आत्माराम लोंढे, प्रा. शीला पांडुरंग गायकवाड, डॉ. नारायण डोलारे, बापू पाटोळे, दीपक जवंजाळे, नकुशा लोखंडे, हनुमंत क्षिरसागर, नामदेव भोंडे, पोपट साळवे, गणेश भालेराव, महेश सकटे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन संजय केंदळे यांनी केले. तर आभार रयत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक नवगीरे सर व दलित स्वयंसेवक संघाचे शहरप्रमुख संतोष माने यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता क्रांती गीताने करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *