३१ डिसेंबर २०२२
नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणाने सभागृह चांगलेच गाजवले. शिंदे गटाने ठाकरे गटावर केलेल्या आरोपांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही जे बाहेर केलं ते आता विसरून जा, मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे राजकीय होतं, अशी टीका अजित पवारांनी केली. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार याचं एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.
अजित पवारांनी सभागृहात छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात केलेल्या एका विधानावरून आता चांगलाच राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
महापुरुषांच्या अवमानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही शब्द काढला नाही. यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरुन अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी अधिवेशनात ठणकावून सांगितलं. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मागणी केली. त्यामुळे काही जण जाणीवपुर्वक धर्मवीर उपाधी लावतात. मी तर नेहमी म्हणतो आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करावा, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.