यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा सवाल आणि घरचा आहेरही उत्तम कुटे पिंपरीःपिंपरी-चिंचवडच नाही,तर पुण्यासह राज्यभरातील अनेकांना राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पक्षात व सत्तेतही मोठमोठी पदे दिली.पण,ही मंडळी दादा आली की तरच व्यासपीठावर यायची हे चित्र उद्योगनगरीने हे अनेकदा अनुभवले.एवढेच नाही,तर काहींनी दादांनी दिलेली पदे भोगून दुसऱ्या पक्षात उड्या घेतल्या.तर,काहीजणांचे…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा सवाल आणि घरचा आहेरही

उत्तम कुटे

पिंपरीःपिंपरी-चिंचवडच नाही,तर पुण्यासह राज्यभरातील अनेकांना राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पक्षात व सत्तेतही मोठमोठी पदे दिली.पण,ही मंडळी दादा आली की तरच व्यासपीठावर यायची हे चित्र उद्योगनगरीने हे अनेकदा अनुभवले.एवढेच नाही,तर काहींनी दादांनी दिलेली पदे भोगून दुसऱ्या पक्षात उड्या घेतल्या.तर,काहीजणांचे दादांवरील हे वरवरचे प्रेम त्यांचे यावर्षी २८ जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातामध्ये आकस्मिक निधन होताच लगेच आटले.यावर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी काल नेमका प्रहार केला.यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं?अशी नेमकी व थेट विचारणा त्यांनी यासंदर्भात सोशल मिडिया त केली.तसेच दादांवरचं प्रेम खरं होतं, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं?असा रोकडा सवालही त्यांनी केला.यातून त्यांनी दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांसह अजितदादांच्या कुटुंबाला लक्ष्य करणाऱ्या पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला.

अजितदादांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही आहेत. दादांनी आपल्याला काय दिलं, किती प्रेम दिलं, किती जपलं याची जाणीव ठेवून दादांच्या माघारी “दादांचा परिवार हाच आपला परिवार” या भावनेने ते निःस्वार्थपणे उभे आहेत,असे एकीकडे सांगताना उमेश पाटील म्हणतात,पण एक गोष्ट मनाला प्रचंड वेदना देते…दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधींवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील, तर मनात एक प्रश्न निर्माण होतो….यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं?परंतू,माझी धारणा अगदी स्पष्ट आहे.ज्याचं दादांवर खरं प्रेम होतं, त्याचं दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावर तेवढंच नव्हे, तर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं,अशी रास्त व माफक अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

दादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राने एक नेता गमावला नाही;तर, एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं.त्यांच्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्याने अचानक वेगळं वळण घेतलं,असे नमूद करीत पाटील पुढे म्हणतात,विशेषतः सुनेत्रा वहिनींना तर दुःखात काही काळ शांत बसण्याचीही उसंत मिळाली नाही. मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही… अश्रू पुसण्याआधीच पक्षाची आणि सरकारची प्रचंड जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली.अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत. दादांनी आयुष्यभर जपलेला पक्ष आणि कार्यकर्त्यांचा परिवार सावरण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.अशा वेळी दादांवर प्रेम असल्याचा दावा करणाऱ्या प्रत्येकाने वहिनींच्या पाठीशी छातीचा कोट करून उभं राहायला हवं होतं,अशी खंत व्यक्त करीत त्यांनी घरभेद्यांना पुन्हा निशाण्यावर घेतलं.दुर्दैवाने, वहिनींचे अश्रू सुकण्याआधीच पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल सातत्याने संशयाचं वातावरण निर्माण करणाऱ्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जाऊ लागल्या. कार्यकर्त्यांच्या आणि आमदारांच्या मनात पक्षाच्या राजकीय भविष्याबद्दल संभ्रम निर्माण होईल,अशी नियोजनबद्ध चर्चा घडवून आणली जात आहे.याचा सर्वाधिक आनंद आपल्या राजकीय विरोधकांनाच होणार आहे,असे सांगत दादांनी आयुष्य घालवून उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर बसून त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात कोणाचंच राजकीय भलं होणार नाही,असा इशारा त्यांनी काही स्वपक्षीयांना दिला.

दादांवर प्रेम असल्याचं सांगणं खूप सोपं आहे…पण दादा नसताना त्यांच्या परिवाराच्या पाठीशी निःस्वार्थपणे उभं राहणं….हीच त्या प्रेमाची खरी परीक्षा आहे,असे पाटील म्हणतात.आज दादा असते तर त्यांनी एकच प्रश्न विचारला असता….“मी गेल्यानंतर माझ्या माणसांना तुम्ही जपलं की त्यांनाच एकटं पाडलं?”आणि मला वाटतं,या एका प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनाला द्यावं…!अशी साद त्यांनी घातली.दादा आज आपल्यात नाहीत.पण दादांनी जपलेला परिवार, दादांनी उभा केलेला पक्ष आणि दादांनी प्रेम केलेला प्रत्येक कार्यकर्ता…..हीच आज दादांची आपल्याकडे असलेली ठेव आहे,असे ते म्हणाले.ती जपणं ही राजकीय सोय नाही…ती दादांप्रती आपली निष्ठा आहे,असे आवाहन करीत त्यांनी आपल्या भावनिक पोस्ट चा शेवट केला.