हजारो खड्डे बुजणार की वरवरची कार्यवाही होऊन शहर पुन्हा खड्यात जाणार?
प्रतिनिधी
पिंपरीः गेल्या महिन्याभरापासून जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवडची दाणादाण उडाली असून सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत.दुसरीकडे चाकण,ठाणे,नाशिक,मुंबईत या खड्यांनी बळी घेतले असून ती वेळ शहरावर येऊ नये म्हणून आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दोन दिवसांत शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले. पण,या मुदतीत हजारो खड्डे योग्य पद्धतीने पूर्ण बुजविण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याने हे शिवधनुष्य प्रशासन कसे पार पाडते याकडे लक्ष लागले आहे.कारण महिन्याच्या अतिवृष्टीने अंतर्गत नाही,तर मुख्य रस्ते व महामार्गाचीही चाळण झाली असून त्याला जुना पुणे-मुंबई,पुणे-नाशिक आणि पुणे-बेंगळूरू हे शहरातून जाणारे महामार्गही अपवाद राहिलेले नाहीत.दरम्यान,या कामात दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
खड्ड्यांची प्रातिनिधीक पाहणी करून रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते व कनिष्ठ अभियंते यांना आयुक्तांनी दिल्या.नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीत नियमित पाहणी करून खड्डे बुजविण्यास त्यांना सांगितले.तसेच ते बुजविताना कामाचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षितता याबाबत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.रस्त्यांबरोबरच रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ व नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांची पाहणी करून आवश्यक तेथे दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिला. यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधान्यक्रम निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी प्रभावी करण्यास त्यांनी सांगितले.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय जबाबदारी निश्चित; दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई
प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी आयुक्तांनी निश्चित केली आहे.तसेच त्यात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा होऊ नये,असे बजावले आहे.ही कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण न झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
दुरुस्तीच्या कामांवर अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता देखरेख ठेवणार असून ते त्याचा आढावाही घेणार आहेत.एवढेच नाही,तर त्याचा दैनंदिन आढावा ते आयुक्तांना देणार आहेत.नागरिकांना सुरक्षित, सुस्थितीत दर्जेदार रस्ते तसेच सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य आहे,असे आय़ुक्त म्हणाले.
