पण,आधार प्रमाणीकरण न झालेले हजारो शेतकरी अद्याप कर्जमुक्तीपासून आहेत वंचितच
प्रतिनिधी
पिंपरीः राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांना ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपयांची कर्जमुक्ती मिळाली.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात काल ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँकांत वर्ग करण्यात आली. तर,राज्यातील ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर ५ हजार २८ कोटी रुपये वर्ग केले गेले.पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर मंत्री व वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.पण, हे आधार प्रमाणीकरण तथा केवायसी न झालेले हजारो शेतकरी या कर्जमुक्ती पासून वंचित राहिलेले आहेत.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील १ हजार ३५१, भोर २ हजार ३०८, मुळशी ५७६, मावळ १ हजार ३५२, खेड २ हजार २०८, शिरुर ४ हजार ७२९, आंबेगाव १ हजार ३५१, इंदापूर ९ हजार २३१ , वेल्हा ४१९, जुन्नर २ हजार १५५, बारामती ८ हजार ५७८, पुरदंर ३ हजार १४३ आणि दौंड १० हजार ६५३ तसेच राष्ट्रीय व इतर बँकेमार्फत २ हजार ३९७ असे एकूण ५० हजार ४४८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ६ ऑगस्टपर्यंत पूर्ण झाले आहे.
कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश बँकांना देण्यात आले असल्याने त्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार आहे.पुणे जिल्ह्यात पहिल्या यादीतील पात्र शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही,त्यांनी ते संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून करून घ्यावे,त्यानंतर पात्रतेनुसार त्यांच्या कर्जखात्यावरही कर्जमुक्तीची रक्कम वर्ग करण्यात येईल,असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
