मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा,दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – कामगारनेते यशवंत भोसले

पिंपरी:प्रशासनाने केवळ पंचनामे आणि पाहणी करण्याऐवजी मोशी कचरा डेपो दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष,कामगार नेते यशवंत भोसले यांनी आज (दि.११)पत्रकार परिषदेत येथे केली. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरल्याशिवाय अशा दुर्घटना थांबणार नाहीत,असे ते म्हणाले.

कचरा संकलन, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी कामे कंत्राटी पद्धतीने करून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आऱोप करीत काही ठेकेदार,दलाल व राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ही बेकायदेशीर व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे,असे भोसले म्हणाले. येथे फक्त ‘सेटिंग मॅनेजमेंट’ सुरू आहे,असा हल्लाबोल त्यांनी केला.कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला या कचरा डेपो तील आधुनिक प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे या दुर्घटनेला हा प्रकल्प बंद ठेवणारे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत,असे ते म्हणाले.दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे स्वागतार्ह असले, तरी त्याने जीव परत आहे का,असा सवाल त्यांनी केला.त्यामुळे मृत कामगाराच्या वारसाला तातडीने महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी आणि या प्रकरणाच्या सखोल चौकशी करण्यासाठीमुख्यमंत्र्यांनी एस.आय.टी. (SIT) नेमावी,अशी मागणी त्यांनी केली.