वनविभागाच्या अधिकाऱ्यांची व समिती सदस्यांची क्षेत्रीय भेट
नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
पुणे जिल्ह्यातील सर्वांग सुंदर व निसर्ग संपन्न जुन्नरच्या पश्चिम घाटातील सडे-पठारे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील गवताळ कुरण संवर्धन व विकास योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करणारे सडेपठारे पर्यटन विकासाचे मॉडेल ठरतील अशा रितीने विकसित केली जातील अशी माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक (डी एफ ओ) प्रशांत खाडे यांनी क्षेत्रीय भेटी दरम्यान वेळी दिली.
वनविभागाच्या सडे पठारे संवर्धन समितीचे सदस्य आणि राज्य सांस्कृतिक धोरण समितीचे सदस्य गणेश कोरे, वनहक्क समितीचे सदस्य किरण लोहकरे यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक स्मीता राजहंस यांनी हिवरे पठार येथील सडेपठारांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
ही सडे पठारे पर्यावरणीय समृद्ध असून, त्यांना असलेले जागतिक अनन्यसाधारण महत्व पाहता पठारांच्या पर्यारणीय शाश्वत विकासाठी युनेस्कोच्या ग्लोबल जीओपार्कमध्ये समावेश करण्यासाठी आराखडा करा, असे पत्र आमदार शरद सोनवणे यांनी वन विभागासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे.त्यानंतर ही पाहणी करण्यासाठी क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
तांबे, सुकाळवेढे, दुर्ग ढाकोबा,हिवरे पठार या भागात ही वैशिष्ठ्यपुर्ण गवताळ पठारे आहेत. काही भाग वनविभागाच्या क्षेत्रात मोडत आहे.तर काही खाजगी शेतकऱ्यांची माळराने आहेत.या सर्वांचा विकसनाचा आराखडा तयार करण्यापुर्वी ग्रामस्थ,येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांची बैठक येत्या काही दिवसांत घेतली जाईल.या बैठकीत गवत या विषयातील तज्ञांकडून प्रबोधन केले जाईल.गवताळ कुरणे विकसित करताना,येथील क्षेत्रमालकांना पशुधनासाठी चाऱ्यांची लागवड,आणि त्यातून पशुपालनातून अर्थार्जन कसे करता येईल या विषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे असे सांगून खाजगी क्षेत्रात पर्यटनाच्या माध्यमातून लोक अर्थार्जन करू शकतील अशा प्रकारे सडेपठार संवर्धनाचे एक मॉडेल प्रथमच जुन्नर तालुक्यात विकसित केले जाईल असे ते म्हणाले.
चौकट
तालुक्यातील पर्यटनवाढीमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. यामध्ये गवताळ प्रदेश, सडे पठारे संवर्धन गरजेचे आहे. गवताळ पठारे जलसंधारणाचे मोठे काम करत असतात. गवताळ प्रदेशाच्या संवर्धनातून आदिवासी भागातील पशुधनाच्या दर्जेदार गवत उपलब्धततेतुन दूधवाढीसाठी ‘मिशन गोकुळ’ अभियान वन आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. सडे पठारे संवर्धन आराखड्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे.
– शरद सोनवणे ( आमदार जुन्नर तालुका )
चौकट
दुग्धव्यवसाय विकसित होईल
सुकाळवेढे – हिवरे पठार पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असून या पठारावरील जैवविविधतेच्या संवर्धनातून निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. गवताळ प्रदेशाच्या संवर्धनातून पशुधनाला चांगले गवत देखील मिळेल. यातुन आदिवासी भागात दूध व्यवसायाला चालना मिळेल.
- दत्ता गवारी
अध्यक्ष -वरसुबाई देवस्थान ट्रस्ट सुकाळवेढे – हिवरे तर्फे मिन्हेर
चौकट
सर्व सदस्यांच्या भेटीसह ग्रामस्थांची बैठक घेणार
‘‘जुन्नर वनविभागातील पश्चिमघाटातील सडे पठारांच्या संवर्धनासाठी जुन्नर वनविभागाने अभ्यासक तज्ञांची समिती स्थापन केली आहे. युनेस्कोच्या ग्लोबल जिओपार्क साठीचा आराखडा करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सुरु केलेला पाठपुरावा येथील शेतकरी आणि पशुधनाच्या विकसनासोबत पर्यटनाच्या कक्षा रुंदविण्यासाठी फायदेशीर ठरेल.
-प्रशांत खाडे (उपवनसंरक्षक,जुन्नर वनविभाग)

