पिंपरी पालिकेत एकाच पदावर दोन अधिकारी!सत्ताधारी भाजपच्या दोन गटांच्या वादातून आली पाळी

पिंपरी पालिकेत एक म्यान,दोन तलवारी,भाजप राजवटीत प्रशासनाच्या कारभाराचा झाला खेळ!

उत्तम कुटे

पिंपरीः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांचे वर्धापनदिन काल (ता.१०) साजरे झाले.याच मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन नगरसचिव मिळाले. सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत वादामुळे एका पदावर दोन अधिकारी आल्याची ही दुर्मिळ घटना त्यांच्या राजवटीत पहायला मिळाली.त्यामुळे त्याची पालिका वर्तुळातच नाही,तर शहरभर मोठी चर्चा सध्या सुरु आहे.

मुकेश कोळप आणि उल्हास जगताप असे हे दोन नगरसचिव आहेत.त्यातील कोळपांनी काल स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीला नगरसचिव म्हणून हजेरी लावली.विशेष म्हणजे त्याअगोदर गेल्या महिन्यात १८ तारखेला महापालिकेचे सेवानिवृत्त नगरसचिव उल्हास जगताप हे पुन्हा एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने नगरसचिव म्हणून रुजू झाले होते म्हणजे आहेत.तर, कोळप यांची ग क्षेत्रीय अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आहे.त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी महापौर रवी लांडगे यांनी केली होती. कारण एप्रिल महिन्याच्या तहकूब पालिका सभेत पीठासीन अधिकारी महापौरांनी पालिका बजेट मंजूर केल्याची घोषणा केली होती.त्यावर त्यांना सभाशास्त्राची माहिती नसल्याचा आरोप विरोधकांनी केल्यावर त्यांनी माफी मागण्याची पाळी आली.मात्र,त्यांनी या चुकीला नगरसचिव कोळपांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली.त्यावर आयुक्तांनी त्यांचा नगरसचिव पदाचा कारभार काढून घेत त्यांच्याकडे ग क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी सोपवली.त्यांच्या जागी जगतापांनी नियुक्ती केली.

मात्र,जगतापांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने असल्याने त्यांना आर्थिक विषय मंजूर करण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत,असा मुद्दा उपस्थित करत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी जगताप यांना नगरसचिव म्हणून स्थायी समितीचे काम पाहण्यास काल विरोध केला.परिणामी,ज्यांची बदली ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी म्हणून झाली होती,त्या मुकेश कोळप यांना बोलावून स्थायीचे कामकाज काल चालवावे लागले. म्हणजेच, आता स्थायी समितीला कोळप आणि सर्वसाधारण सभेसह इतर विषय समित्यांच्या बैठकांसह इतर कामांना जगताप… असा ‘एक म्यान, दोन तलवारी’ सारखा कारभार पालिकेत सुरू होणार आहे.

दरम्यान,बोगस उपसुचनांव्दारे झालेल्या साठ कोटींच्या कथित घोटाळ्यात फौजदारी करण्याचा चेंडू जसा आयुक्तांनी राज्य सरकारकडे टोलवला,तसाच या प्रकरणात सुद्धा तो तिकडेच टोलवण्यात आला आहे.कंत्राटी नगरसचिव हे स्थायी समितीत बसून काम करू शकतात का,अशी विचारणा आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे करण्यात आली असून त्यांचा निर्णय येईपर्यंत,तरी पिंपरी पालिकेत नगरसचिव या एका पदावर दोन अधिकारी काम करणार आहेत.

शहर भाजपातील अंतर्गत वाद व गटबाजीतून हे शह काटशहाचे राजकारण रंगल्याचे आणि त्यातून पालिकेला एक नाही,तर दोन नगरसचिव मिळाल्याने व या पदाचा घोळ तसेच खेळ झाल्याचे समजते.भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापौर लांडगे यांच्यामुळे कोळपांची नगरसचिव पदावरून उचलबांगडी झाली.तर,त्यांच्या जागी आलेल्या जगतापांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील स्थायी समिती सभापती बारणेंनी स्थायी त एंट्री देण्यास विरोध केल्याची चर्चा आहे.भाजपच्या शहरातील दोन आमदारांच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या या इगो वॉर मध्ये महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे,मात्र बारा वाजले आहेत.

पिंपरी पालिकेतील गोंधळाच्या कारभाराचे हे पहिलेच उदाहरण नसून गेल्या चार महिन्यांत असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून ‘शहर अभियंता’पद रिक्त आहे.शहरातील सत्ताधारी आमदाराचा दबाव आणि हस्तक्षेपामुळे मकरंद निकम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ते रिक्त झालेले आहे.सात स्वीकृत सदस्यांच्या नावांवर तीन महिन्यांपासून भाजपाचे एकमत न झाल्याने पालिकेतील दहा सदस्यांची निवड रखडलेली आहे.हे कमी म्हणून की काय साठ कोटींचा संशयास्पद कारभार समोर आला. बोगस उपसूचनांवर नगरसेवकांनी सह्या केल्याने लेखा विभागाने ठेकेदारांना तब्बल ६० कोटी रुपयांची बिलं चुकीच्या पद्धतीने दिली. याप्रकरणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची बदली झाली असून चौकशी समितीचा तपास सुरू आहे.तो सुरू असताना आता हा दोन नगरसचिवांचा नवीन घोळ समोर आला.हा सर्व प्रकार पाहिल्यावर महापालिकेत नक्की चाललंय काय?असा प्रश्न सजग नागरिक आता विचारू लागले आहेत.