उत्तम कुटे
पिंपरीः राज्यातील अनेक तालुक्यांत त्यातही पुणे जिल्ह्यात नोटरीची तिकिटे मिळत नसल्याने त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नोटरी वकिलांना सध्या जावे लागते आहे.त्यामुळे ती सर्व तालुक्यांतील उपकोषागारात उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी महाराष्ट्र राज्य नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक चौधरी-पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नुकतीच केली.त्यावर हा महत्वाचा प्रश्न असल्याने काही दिवसांत ती तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे अॅड. चौधरी यांनी आज सांगितले.

यावर्षी केंद्र सरकारने राज्यात आणखी ५ हजारांपेक्षा जास्त नवीन नोटरी वकिलांची नियुक्ती केली असून त्यांनाही आपले दैनंदिन कायदेशीर कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणारी नोटरी तिकिटे मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य कोषागार कार्यालयात उपलब्ध असलेल्या य़ा तिकिटांसाठी दूर ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो,याकडे अॅड. चौधरी यांनी लक्ष मंत्र्यांचे वेधले.राज्यातील प्रत्येक तहसील उपकोषागार कार्यालयात नोटरी तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली, तर प्रत्येक तालुक्यातील शेकडो नोटरी वकिलांना तिकिटांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज उरणार नाही.
त्यांचा वेळ व पैसा आणि इंधनाची बचत होईल,असे ते म्हणाले.
दरम्यान,महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन ने ही मागणी यापूर्वीच केली असल्याचे तिचे अध्यक्ष अॅड अतिष लांडगे यांनी सांगितले.त्यानंतर राज्यात काही तालुक्यांच्या ठिकाणी नोटरी तिकिटे मिळू लागली असली,तरी पुणे जिल्ह्यात ती अद्याप उपलब्ध झालेली नाहीत,असे ते म्हणाले.उपकोषागारात ही तिकिटे मिळावीत यासाठी आता विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यामार्फत पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे,असे अॅड लांडगे यांनी सांगितले.

