मंत्री आले आणि घोटाळेबाज उमेदवारांचे नाव घेणेही त्यांनी टाळले

कान्हूर मसाईत भाजपच्या प्रचाराला ‘ब्रेक’, विखे पाटीलांचा काढता पाय? शिरूर प्रतिनिधीरांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कान्हूर मसाई येथे दाखल झाले खरे, मात्र उमेदवारांचा साधा उल्लेखही न करता ते पुढे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याकडून भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात प्रचाराऐवजी…

कान्हूर मसाईत भाजपच्या प्रचाराला ‘ब्रेक’, विखे पाटीलांचा काढता पाय?

शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कान्हूर मसाई येथे दाखल झाले खरे, मात्र उमेदवारांचा साधा उल्लेखही न करता ते पुढे निघून गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्याकडून भाजप कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र प्रत्यक्षात प्रचाराऐवजी कान्हूरच्या पाणी प्रश्नावर बैठक घेऊन मंत्री महोदयांनी कार्यक्रम आटोपता घेतला. यावेळी एका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान करण्याचे आवाहन करा असे हळू आवाजात सांगूनही मंत्री विखे पाटील यांनी दुर्लक्ष केले की काय असा प्रश्न देखील उपस्थित होतो. विशेष म्हणजे, भाजपचे तीनही अधिकृत उमेदवार व्यासपीठावर असतानाही त्यांचा ना परिचय, ना नावाचा उल्लेख—यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

शिरूर तालुक्यातील काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. या भागाला पाणी मिळावे म्हणून मंत्रालयात अनेक बैठका झाल्या, पण आजवर ठोस उपाययोजना मात्र कागदावरच राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कान्हूर मसाईतील काही युवकांनी पुढाकार घेत खाजगी पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नांनाही काहींनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला—तो अयशस्वी ठरल्यानंतरच भाजपच्या उमेदवारांनी मंत्री विखे पाटील यांना प्रचारासाठी साकडे घातल्याची चर्चा आहे.

मंत्री आले, पण प्रचार झाला नाही—हीच बाब आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. आधीच भाजपच्या काही उमेदवारांचे कथित कारनामे माध्यमांत झळकत आहेत. रांजणगाव गणपती परिसरातील जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे मतदारांमध्ये असलेली नाराजी सर्वश्रुत आहे. हे वास्तव लक्षात घेऊनच मंत्री विखे पाटील यांनी प्रचारापासून अंतर ठेवत ‘काढता पाय’ घेतला की काय? असा संशय व्यक्त केला जात आहे.

एकूणच, मंत्र्यांचा दौरा झाला… पण भाजपच्या प्रचाराला मात्र ब्रेक लागला, अशीच चर्चा सध्या कान्हूर मसाईपासून रांजणगाव-कारेगाव गटात रंगू लागली आहे.