विखे पाटील यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचार सिद्ध केला,त्यांच्या प्रचार सभेला ते येणार का?

विखे पाटील यांना ग्रामस्थ दाखवणार काळे झेंडे

प्रतिनिधी | शिरूर

शिरूर : राज्यातील राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडत आहे. ज्या उमेदवारावर २५ कोटी रुपयांची मौल्यवान शासकीय जमीन लाटल्याचा ठपका स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला होता, त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आज प्रत्यक्ष मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हा प्रकार म्हणजे जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा असून, नैतिकतेचा, पारदर्शकतेचा आणि राजकीय प्रामाणिकतेचा घोर अपमान असल्याची भावना नागरिकांत तीव्रपणे व्यक्त होत आहे.

अजितदादांच्या निधनानंतरही राजकारण?

राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या अचानक निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने तीन दिवस प्रचार बंद ठेवून संयम व संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या प्रचारसभा रद्द केल्या.

मात्र, अशा दुःखद वातावरणातही मंत्री विखे पाटील यांचे शिरूर तालुक्यात येणे आणि वादग्रस्त उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर जाणे, हे केवळ दुर्दैवीच नव्हे तर जनभावनांना तुडवणारे असल्याची तीव्र चर्चा सुरू आहे.

भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब – आणि तरीही प्रचार?

रांजणगाव-कारेगाव गटातील उमेदवार स्वाती दत्तात्रेय पाचूंदकर यांच्यावर रांजणगाव येथे ७२ गुंठे (जवळपास दोन एकर) मोक्याची जमीन बनावट कागदपत्रांद्वारे हडप केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, Bombay High Court यांनीही कारवाईस दुजोरा दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, याच प्रकरणात मंत्री विखे पाटील यांनी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी स्पष्ट आदेश देत संबंधित जमिनीवरून आनंदराव पाचूंदकर यांचे नाव काढून शासनाचे नाव लावण्याचे निर्देश दिले होते. म्हणजेच, भ्रष्टाचार मान्य करून आदेश देणारे तेच मंत्री आज त्या उमेदवाराच्या प्रचारात उतरू पाहत आहेत – हा राजकीय दुटप्पीपणाचा कळस नाही तर काय?

अजितदादांचे शेवटचे काम – आणि त्यावर राजकारण?

कान्हूर मेसाई गावाच्या पाणी प्रश्नासाठी अजितदादांनी थेट कंपनीच्या डीलरला फोन करून पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली होती. ग्रामस्थांनी या योजनेला श्रद्धेने “श्री मेसाई देवी उपसा सिंचन योजना” असे नाव दिले आहे.

आज, अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत, त्यांच्या या शेवटच्या जनहिताच्या कामावर राजकीय श्रेय लाटण्यासाठी मंत्री विखे पाटील गावात प्रचारासाठी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

ग्रामस्थांचा इशारा – काळे झेंडे दाखवणार

या अन्यायकारक वागणुकीविरोधात कान्हूर मेसाईसह संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध करण्याचा इशारा दिला आहे.
जनतेच्या मते, हा लढा कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून, भ्रष्टाचार, दुटप्पी राजकारण आणि जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे.

सहानुभूती, विश्वास आणि आदर – अजितदादांभोवती जनभावना

आज शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात एकच भावना आहे –
“अजितदादांनी आयुष्यभर जनतेसाठी काम केले. शेवटच्या क्षणापर्यंत ते लोकांच्या प्रश्नांसाठी झटले. त्यांच्या स्मृतीचा सन्मान ठेवणे हीच खरी श्रद्धांजली आहे.”

त्यामुळेच, अजितदादांच्या नावावर राजकारण करून भ्रष्ट उमेदवारांना पुढे रेटण्याचा प्रयत्न जनतेला मान्य नसून, हा प्रकार थांबवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरण्यास सज्ज झाली आहे.

ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर सत्य विरुद्ध असत्य, प्रामाणिकपणा विरुद्ध दुटप्पीपणा आणि जनहित विरुद्ध सत्तालालसा यांच्यातील लढाई ठरत आहे.
आणि या लढाईत शिरूर तालुक्याची जनता कोणाच्या बाजूने उभी राहणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.