स्पा तथा मसाज पार्लर च्या नावाखाली शहरात राजरोस सुरु आहे वेश्याव्यवसाय

गेल्यावर्षी ८,यावर्षी दोन स्पा मधील हा गैरप्रकार पि.चि.पोलिसांनी केला उघड

प्रतिनिधी
पिंपरीःस्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा उद्योग हा उद्योगनगरीत फोफावू लागला असून त्यावरील पोलिस कारवाईने त्याला दुजोराही मिळाला आहे.कालच वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चक्क इटर्नल फॅमिली स्पा च्या नावाखाली सुरु हा गैरप्रकार सुरु असल्याचे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या कारवाईत समोर आले.गेल्याच महिन्यात असा गैरधंदा सुरु असलेल्या निगडीतील ईगल स्पा वर या कक्षाने अशीच कारवाई केली होती.असे प्रकार सुरु असलेल्या तीन ठिकाणांना गेल्या महिन्यात पोलिस आयुक्त (सीपी)विनयकुमार चौबे यांनी वर्षभरासाठी टाळे लावले.त्यात काळेवाडी परिसरातील “लेमन ग्रास थाई स्पा व सांगवी परिसरातील “औरा थाई स्पा”चा समावेश आहे.गेल्यावर्षी कॉलगर्ल रॅकेट सुरु असलेल्या ६ स्पां ना सीपीं नी असाच दणका दिला होता.तरीही त्यानंतरही स्पा मध्ये हा अनैतिक प्रकार सुरु असल्याने आढळल्याने काल ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय असा अनैतिक व्यवसाय सुरु राहत नसल्यामुळे सबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखावर सीपीं नी कारवाईची मागणी पुढे आली आहे. दुसरीकडे शहरात ऑनलाईन वेश्याव्यवसायही वाढीस लागल्याचे पोलिसांना आढळले आहे.

शहर पोलिसांच्या मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते व त्यांच्या पथकाने काल विशाल नगर,जगताप चौक, पिंपळे निलख येथे ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ.शिवाजी पवार,सहाय्यक आयुक्त डॉ.विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली केली.तेथून चार महिलांची सुटका करण्यात आली.एक महिलाच हे स्पा चालवित होती.तिच्यासह तिचा मॅनेजर अब्दुल मोहमद हुसेन कलाम (वय ३२, रा. सदर, मुळ रा.आसाम) यांच्याविरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.गेल्या महिन्यात या कक्षाने निगडी तील “EAGLE SPA” येथे छापा टाकुन २ महिलांची सोडवणूक केली होती.निगडीतीलच “कृष्णा लॉज” तर,आळंदी परिसरतील “योगीराज लॉज”वर अशीच कारवाई करून तेथून एकेका महिलेची सुटका करण्यात आली होती.गेल्यावर्षी या कक्षाने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या एकुण २८ ठिकाणी छापे टाकले.त्यात एकुण ८ मसाज पार्लर/स्पा, ७ हॉटेल, ३ रहिवाशी फ्लॅट व १० ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणारा वेश्याव्यवसाय यांचा समावेश होता.या २८ गुन्हयात ४५ आरोपींना अटक करण्यात आली,तर ६३ पिडीत महिलांची सुटका केली गेली.सार्वजनिक रस्त्यावर उभे राहुन अश्लिल हातवारे करणाऱ्या १०७ महिलांविरुध्दही पिटा अॅक्ट कलम ८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.