कुठलाही पुरावा नसलेला निर्घूण खूनाचा गुन्हा चाकण उत्तर पोलिसांनी शिताफीने केला उघड
प्रतिनिधी
पिंपरीःअनैतिक संबंधातून बिरदवडी (ता.खेड,जि.पुणे) येथे कोयत्याने डोक्यात वार करून व दगडाने ठेचून करण्यात आलेल्या एका तरुणाच्या निर्घूण खूनाचा गुन्हा चाकण उत्तर पोलिसांनी मारेकऱ्यांनी कसलाही पुरावा मागे ठेवला नसतानाही मोठ्या शिताफीने उघडकीस आणला.याप्रकरणी मायलेकांसह तिघांना अटक केली. त्यातील दोघे चाकण एमआय़डीसी तील एका खासगी कंपनीत कामाला असून महिला आरोपी गृहिणी आहे.या महिलेशी मयत तरुणाच्या असलेल्या अनैतिक संबंधातून तो तिला त्रास देऊ लागल्याने तिच्या मुलाने मित्राच्या मदतीचे त्याचा कायमचा काटा काढल्याचे पोलिस तपासात समजले.
सीसीटीव्ही मध्ये जाताना तिघे,मात्र येताना दिसलेले दोघे आणि घटनास्थळी मिळालेली दारूची बाटली या सुतावरून चाकण उत्तर पोलिस या नव्याने तयार झालेल्या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम व त्यांच्या पथकाने स्वर्ग गाठून हा खूनाचा गुन्हा उघडकीस आणला.त्यासाठी वीस दिवस मेहनत घेतली.गेल्या महिन्याच्या ११ तारखेला बिरदवडी गावच्या स्मशानभूमी जवळील ओढ्यात एका तरुणाचा दगडाने छिन्नविछिन्न केलेला मृतदेह आढळला.त्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.कारण तो स्थानिक नव्हता.तसेच त्याच्याजवळील पुरावा ठरू शकणारी आधारसारखी कागदपत्रे,मोबाईल फोन व इतर ऐवज हल्लेखोरांनी आपला मागमूस लागू नये म्हणून काढून नेली होती.चोरी तथा लुटीतून हा प्रकार झाल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.तरीही पोलिसांनी मयताची ओळख पटवली.तो गंगाखेड (जि.परभणी) येथे एका हॉटेलात काम करणारा मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५) असल्याचे शोधून काढले.आता त्याचा इकडे एवढ्या दूरवर खून का झाला हे शोधणे त्यांच्यापुढे एक मोठे आव्हान होते.त्यासाठी त्यांना घटनास्थळी मिळालेल्या दारूच्या बाटलीची व त्या परिसरातील सीसीटीव्ही ची मोठी मदत झाली.त्या परिसरातील दारुच्या दुकानांत चौकशी केली असता आरोपी निखील नानासाहेब चव्हाण (वय २१, रा. खराबवाडी, ता.खेड,मुळ रा काधनेश्वर पो.धसाडी ता गंगाखेड जि परभणी) याने ती नेल्याचे समजले.त्यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला साथीदार स्वप्नील नरहरी पारधी (वय १९,रा.खराबवाडी)व आईच्या मदतीने हा खून केल्याचे सांगितले. मयत मुंजा व आरोपी निखीलची आई हे गंगाखेडला एका हॉटेलात काम करीत असताना ओळख होऊन नंतर त्यांच्यात अनैतिक सबंध निर्माण झाले.दरम्यान,निखील याला चाकणला नोकरी लागल्याने तो आईसह इकडे आला.त्यामुळे त्याची आई व मुंजा यांच्यात फोनवरून भांडणे होऊ लागली.तो तिला त्रास देत असल्याचे निखीलच्या लक्षात येताच त्याने स्वप्नीलसह कट रचला.मुंजाला गावाहून इकडे बोलावून घेतले.त्याला दारू पिण्यासाठी ते निर्जन स्थळी म्हणजे बिरदवडीच्या स्मशानभूमीजवळ घेऊन गेले.तेथे नशेतील मुंजावर दोघा आरोपींनी कोयत्याने डोक्यात वार केले.नंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचला.७ जानेवारीला ही घटना घडली.त्यानंतर चार दिवसांनी ती उघडकीस आली.

