महापौर,उपमहापौर निवडीचा भाजप आनंदोत्सव करणार नाही,अजितदादांना वाहणार श्रद्धांजली..

प्रतिनिधी,
पिंपरीःमहापौर,उपमहापौर पदासाठी भाजपातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता.२) रवी लांडगे आणि शर्मिला बाबर यांनी उमेदवारी अर्ज भरले.महापालिकेतील भाजपचे बहूमत पाहता हे दोघेही निवडून येणार आहेत.त्याची औपचारिक घोषणा येत्या शुक्रवारी (ता.६) होणार आहे.मात्र,त्याचा आनंदोत्सव भाजपा करणार नाही.उलट ते अजितदादांना श्रद्धांजली वाहणार आहेत.दरम्यान,नवे महापौर नागरिकांच्या सेवेचे निर्णय घेतील आणि पदावरील निवड सार्थ ठरवतील,असा विश्वास चिंचवडचे भाजपा आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. तर, रवी लांडगे यांना महापौर पदाचा मान दिल्याने ही स्व.अंकुश लांडगे यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे,असे भोसरीचे भाजपा आमदार महेश म्हणाले.

महापौर म्हणून रवी लांडगे शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम करतील,असे आ.जगताप म्हणाले.त्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या सभागृहातून शहरासाठी सर्वंकष विकासाचे निर्णय होतील आणि शहराच्या प्रगतीची घोडदौड कायम राखली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पक्षावर पिंपरी-चिंचवडकरांनी विश्वास टाकल्याने आतो तो पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक नगरसेवकाची जबाबदार पालक या नात्याने आहे,असे ते म्हणाले.

तर,शहराच्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आ.लांडगेंनी दिली.शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देवून शाश्वत विकासाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी नवे महापौर रवी लांडगे यांच्या माध्यमातून विधायक कार्य होईल, असा विश्वास त्यांनीही व्यक्त केला.गावकी-भावकी एकत्र राहिली पाहिजे,असे सांगत त्यातून शहर विकासाचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार एकजुटीने करणार आहोत,असे ते म्हणाले.त्यासाठीच महापालिका निवडणुकीपूर्वी गावकी-भावकीतील मतभेद दूर करुन एकोप्याने शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.राज्याचे लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे महापौर,उपमहापौर निवडीचा आनंदोत्सव भाजपा साजरा करणार नाही,असे ते म्हणाले.पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी तो न करता स्व. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी,असे अवाहन त्यांनी केले आहे.