पि.चि.मध्ये बिनविरोध नगरसेवक झालेले रवी लांडगे आता महापौरही बिनविरोधच होणार

मात्र,उपमहापौरपदी संधी दिलेल्या शीतल शिंदेंनी ती नाकारल्याने शर्मिला बाबरांना लॉटरी

प्रतिनिधी
पिंपरीःमहापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला स्पष्ट बहूमत मिळाले.१२८ पैकी ८४ जागा त्यांनी जिंकल्या.तरी त्यांनी महापौर पदाचा उमेदवार जाहीर करायला १७ दिवस घेतले. अखेर ही माळ पुन्हा भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या गळ्यात पडली.तेथून बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे हे बिनविरोध महापौर होणार हे स्पष्ट झाले.कारण महापौर निवडणुकीसाठी फक्त त्यांचाच अर्ज आला.त्याचवेळी शहर भाजपातील नाराजी समोर आली.उपमहापौर पदासाठी अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट आला.त्याकरिता संधी दिलेले विजय ऊर्फ शीतल शिंदे यांनी ती साफ नाकारली.त्यामुळे ऐनवेळी शर्मिला बाबर यांना ती दिली गेली.त्यांना लॉटरी च लागली.

महापौरपद शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्याने महापालिका खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीचे सभापतीपद हे आता चिंचवड कडे जाणार हे आता स्पष्ट झाले.त्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांचे नाव घेतले जात आहे.दरम्यान,दोन दिवसांपूर्वीच भाजपाच्या गटनेतेपदी चिंचवड मधीलच प्रशांत शितोळेंची नेमणूक झाली.ते नुकतेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपात आले आहेत.त्यांना गटनेते केल्याने एकनिष्ठ भाजपा नगरसेवक नाराज झाले होते.त्यांची नाराज दूर करण्यासाठी शीतल शिंदेंना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली.पण,स्थायी समिती सभापती व्हाय़चे असल्याने नाराज होत त्यांनी या पदासाठी अर्जच भरला नाही.त्यातून शहर भाजपातील जुना व नवा सुप्त संघर्ष पुन्हा समोर आला.आयाराम ला गटनेते केल्यानंतर त्यांच्याबरोबर घरवापसी केलेले रवी लांडगे यांना,तर थेट महापौर पदाची संधी देण्यात आल्याने शहर भाजपातील नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चिंचवड मधील शितोळेंना गटनेते केल्यानंतर भाजपाने भोसरीतील लांडगेंना महापौर,तर पिंपरी तील शिंदेंना उपमहापौर पदी संधी देत शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात पद वाटपात समतोल साधण्याचा प्रयत्न केला होता.मात्र,त्याला शिंदेनी ही संधी नाकारून धक्का दिला.एक प्रकारे त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा आदेश धुडकावला.कारण त्यांनीच सकाळी शिंदेसह लांडगेंच्या उमेदवारीचे पत्र आपले शहराध्यक्ष काटेंना दिले होते.आता शिंदेची नाराजी ही त्यांना स्थायी चे सभापती करून दूर केली जाते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.पण,तशी शक्यता दिसत नाही. कारण हे पद चिंचवड आपल्याकडे घेणार असल्याची मोठी चर्चा आहे.

बिनविरोध नगरसेवक झालेले रवी लांडगे आता बिनविरोध महापौर होणार

महापौरपदासाठी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक झालेले रवी लांडगे यांचाच फक्त अर्ज आला.त्यामुळे नगरसेवकाप्रमाणे ते महापौरही बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले.फक्त त्याची औपचारिक घोषणा ही येत्या शुक्रवारी ६ तारखेला महापालिकेच्या विशेष सभेत होणार आहे.स्थायी समितीचे १६,तर विधी,महिला व बालकल्याण,शहर सुधारणा आणि क्रीडा या चार विषय समित्यांचे प्रत्येकी नऊ सदस्य याच सभेत निवडले जाणार आहेत.दुसरीकडे काळभोर यांनी माघार घेतली नाही,तर उपमहापौर पदासाठी,मात्र निवडणूक होऊ शकते.त्यात भाजपाचा विजय नक्की आहे.कारण त्यांच्याकडे बहूमत आहे.