पहिले पद चिंचवड कडे,पिं.चि.मनपा त भाजपा च्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे

आता महापौर पद भोसरीकडे जाणार की ते ही चिंचवड आपल्याकडेच राखणार?

पिंपरी:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाने यावेळी पुन्हा बाजी मारली.सलग दुसऱ्यांदा बहूमत मिळवले.तरीही पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची गट नोंदणी करण्यास त्यांना दोन आठवडे लागले.१६ जानेवारीला निकाल लागल्यानंतर त्यांनी ३१ तारखेला ही नोंदणी केली.त्याजोडीने त्यांनी आपला गटनेताही निवडला.त्या पदी अनुभवी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली.त्यातून भाजपाचे महापालिकेतील पहिले पद हे चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेले.त्यामुळे आता महापौर भोसरीचा होणार की चिंचवड आणि भोसरीच्या शर्यतीत शहराचा प्रथम नागरिक हे प्रतिष्ठेचे,बहूमानाचे पद पिंपरी कडे जाणार याची उत्सुकता आहे.

महापोर,उपमहापौर,स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांची सदस्य निवड ही येत्या सहा तारखेला नव्या सभागृहाच्या पहिल्या बैठकीत होणार आहे.त्याच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजपाने प्रथम आपली गटनोंदणी केली.गटनेता निवडला.शितोळे हे यापूर्वी दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले असून स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविलेले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या २२ माजी नगरसेवकांचा मोठा गट भाजपात गेला.त्यात शितोळेही होते.प्रभाग ३२ मधून ते निवडून आले आहेत.त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा सर्व नगरसेवकांना होईल,असे भाजपाचे चिंचवडचे आमदार तथा महापालिका निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले.सर्वांना सोबत घेऊन,सर्वांच्या विचाराने ते काम करतील ,असे ते म्हणाले.