अजितदादा हे विकासाचे चालतं बोलतं विद्यापीठ होतंः आ.अमित गोरखे

कार्यकर्त्यांसाठी पूर्ण आयुष्य वेचणारा असा नेते होणे नाहीःआ.उमा खापरे

प्रतिनिधी
पिंपरीः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय शोकसभा शुक्रवारी (ता.३०) झाली.तिला विविध संस्था,संघटनांचेही प्रतिनिधी हजर होते.यावेळी अजितदादांच्या झालेल्या आठवणींच्या जागरामुळे ते जणू काही पुन्हा आल्याचा भास झाला.त्यातही माजी नगरसेविका सीमा सावळे तसेच शिवसेनेच्या उपनेत्या व नवनिर्वाचित नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या श्रद्धांजलीपर भाषणाची चर्चा ही सभा संपल्यावरही सुरु होती.भाजपाचे विधान परिषद सदस्य उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्या मनोगतानेही उपस्थित हेलावून गेले.

अजितदादा हे विकासाचे चालतं बोलतं विद्यापीठ होतं,असं गोरखे म्हणाले.अजितदादांचे विमान अपघातात निधन झाल्याच्या एक दिवस आधीच त्यांच्याशी मुंबईत मंत्रालयात भेट झाली.त्यावेळी तब्येत,घर सांभाळ असे ते म्हणाले अन दुसऱ्याच दिवशी त्यांच्याच निधनाची बातमी आली,अशी आठवण त्यांनी सांगितली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात दोन महिने आधी उतरलो असतो,तर वेगळं घडलं असतं,असे ते त्या भेटीत म्हणाले होते,याचा उल्लेखही त्यांनी केला.२००२ मध्ये अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होताच विरोधी पक्षनेते असलेल्या अजितदादांनी भेटीस बोलावले.या महामंडळात सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगत नीट काम करण्याचा सल्ला दिला होता,असे ते म्हणाले.विधान परिषदेवर निवड झाल्यावर ते मला आमदारसाहेब म्हणायचे.साहेब म्हणू नका असं म्हणताच पदाला महत्व आहे,असे ते सांगायचे,असा अजितदादांच्या दिलदार वृ्त्तीचा प्रसंग आ.गोरखेंनी यावेळी सांगितला.

व्हिजन असणारा नेता गेला हे राज्याचे दुर्दैव असून उभे आयुष्य कार्यकर्त्यांसाठी वेचणारा असा नेते होणे नाही,असे आ.खापरे श्रद्धांजलीपर भाषणात म्हणाल्या.त्यांच्याप्रमाणेच आकस्मिक निधन झालेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याचे त्यांनी सांगितले.देवा काय चुकलं आमचं की असं तू आमच्याशी वाईट वागलात,असे त्या म्हणताच सभेचे वातावरण आणखी गंभीर झाले.भाजपाचे शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांनी अजितदादांचा विकासपुरुष,लोकनेते असा उल्लेख यावेळी केला.३५ वर्षात गावांचे शहरपण करण्यात अजितदादांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या सभागृहात दादांसोबत उपस्थित राहायचो,तेथेच त्यांना श्रद्धांजली वाहायला लागणे अत्यंत वेदनादायी असल्याचे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले.दादांच्या नावे जे करता येईल ते राजकीय मतभेद विसरून करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,असे त्यांनी सांगितले.तर,धाडस हा शब्द आधुनिक राजकारणात अजितदादांमुळे आला अन आता तो त्यांच्या निधनाबरोबर गेला,असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित नगरसेवक भाऊसाहेब भोईर म्हणाले.महापालिकेत त्यांचा पुतळा उभारण्याची आणि शहरातील प्रत्येक नाट्यगृहात त्यांचे तैलचित्र लावण्याची सूचना त्यांनी केली.