शहर घडविणाऱ्या अजितदादांसाठी शोकसभा घेण्याची वेळ येणे हे पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्दैव ःआ.शंकर जगताप

माफ करा,असे म्हणत भोसरीचे भाजपा आमदार महेशदादा लांडगेंनी स्व.अजितदादा पवार यांना वाहिली श्रद्धांजली

प्रतिनिधी
पिंपरीःराज्याचे उपमुख्यमंत्री,पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानिमित्त आज (ता.३०) पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.साडेतीन तास चाललेल्या या सभेत मनोगत व्यक्त केलेल्या सर्वांनीच अजितदादांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.ही सभा झालेले चिंचवडचे प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह तुडूंब भरून गेले होते. ज्यांनी हे शहर घडवलं,त्या अजितदादांसाठी शोकसभा घेण्याची वेळ येते,हे पिंपरी-चिंचवडकरांचे दुर्दैव आहे,अशी खंत चिंचवडचे भाजपा आमदार शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केली.तर,या सभेला पूर्ण वेळ उपस्थित राहिलेले भाजपाचेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादा माफ करा, असे हात जोडत म्हटले अन त्यांना श्रद्धांजली वाहत ते मंचावरून खाली उतरले.यामुळे सभेचा नूर एकदम पालटून गेला.

अजितदादांच्या निधनाने पिंपरी-चिंचवडची नाही,तर राज्याची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याचे आ.जगताप म्हणाले. अजितदादांनी तयार केलेला कार्यकर्ता असल्याने त्यांच्यासाठी जे करता येईल,ते मी करणार,असे त्यांनी सांगितले.शहरातील सर्व नाट्यगृहांत वर्षभरात अजित दादांचे तैलचित्र लागलेले असेल,तसेच महापालिकेच्या नव्या वास्तूसमोर त्यांचा भव्य पुतळाही उभारला जाईल,असा शब्द त्यांनी दिला.महापालिकेत भाजपाला बहूमत मिळाले असले तरी अतिरेकीपणा होणार नाही,असे आश्वासन त्यांनी दिले.

गेल्या काही काळापासून महेशदादा आणि अजितदादा यांच्यात सुरु असलेल्या कोल्ड वॉर ने नुकत्याच संपलेल्या महापालिका निवडणुकीत टोक गाठले.दोघांनी एकमेकांवर आरोप,प्रत्यारोप केले.त्याची मोठी चर्चा झाली.त्यानंतर दोन दिवसांपूर्वी (ता.२८)अजितदादांचे अचानक निधन झाले.त्यानिमित्त आयोजित या श्रद्धांजली सभेत महेशदादा काय बोलणार याकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले होते.दरम्यान,माजी नगरसेविका सीमा सावळे यांनी अगोदर बोलताना महेशदादांवर तोफ डागली.तर,शिवसेनेच्या उपनेत्या आणि नवनिर्वाचित नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सुद्धा समोर बसलेल्या महेशदादांना उद्देशून मेल्यावर वैर संपवण्यापेक्षा ते हयात असताना संपवलेल बरं असतं,असे कान टोचले.त्यामुळे या दोघींनंतर महेशदादा काय बोलतात,याची मोठी उत्सुकता होती.पण,फक्त दोन वाक्यांतच आपले मनोगत त्यांनी संपवले. माफी मागत एकप्रकारे पश्चातापच झाल्याचे त्यांनी सूचित केले.त्यामुळे त्यांच्या या न झालेल्या भाषणाचीही मोठी चर्चा झाली.

या शोकसभेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.त्यातील अनेकांना बोलताना आपल्या भावना अनावर झाल्या. धाय मोकलून त्या रडल्या. त्यामुळे या गंभीर सभेचे वातावरण आणखी गंभीर झाले.