जिल्हा परिषद,तालुका पंचायतीची शिरुर तालुक्यातील ही पहिली उमेदवारी ठरणार
प्रतिनिधी
पिंपरीःपुढील महिन्याच्या पाच तारखेला होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ तालुका पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १६ तारखेपासून सुरुवात झाली आहे.मात्र,अद्याप त्याला वेग आलेला नाही.दरम्यान,उद्या शिरुर तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ज्योती पाचूंदकर,तर तालुका पंचायतीकरिता निर्मला नवले,महेश फंड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार एकत्रितपणे मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सकाळी दहा वाजता दाखल करणार आहेत.
रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकातून मिरवणुकीने वरील तिघे उमेदवारी दाखल करण्यास निघणार आहेत.यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.पाचूंदकर या रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातून (मतदारसंघ) आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.तर,या गटातील पंचायत समितीच्या कारेगाव-कान्हूर मेसाई गणातून (मतदारसंघ) नवले,तर रांजणगाव गणपती गणातून फंड उमेदवारी अर्ज भरणार आहेत.आतापर्यंत शिरुर तालुक्यातून कोणीही जिल्हा परिषद वा तालुका पंचायतीसाठी उमेदवारी भरली नसल्याने हे तिघे ती दाखल करणारे पहिले ठरणार आहेत.
१६ जानेवारीपासून पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ तालुका पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली.२१ तारखेपर्यंत ही मुदत आहे.काल रविवारची सुट्टी होती.१६ व १७ अशा पहिल्या दोन दिवसांत जिल्हा परिषेदसाठी ४ तर तालुका पंचायतीकरिताही तेवढेच म्हणजे एकूण आठ उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्यात दाखल झाले.त्यात खेड तालुका आघाडीवर आहे.तेथून जिल्हा परिषदेसाठी दोन,तर तालुका पंचायतीकरिता तीन अर्ज आले आहेत. हवेली तालुक्यातून एकेक अर्ज पंचायत समिती व जिल्हा परिषद,तर बारामतीतून ते दोन जिल्हा परिषदेकरिता आले आहेत.
