प्रभारी आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांची बदली की तेच कायम होणार?
उत्तम कुटे
पिंपरीःप्रथमच पावणेचार वर्षे एवढा प्रदीर्घ काळ राहिलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासक राज नुकत्याच महापालिका निवडणूक झाल्याने आता संपुष्टात येणार आहे.महापौर आरक्षण सोडत गुरुवारी (ता.२२) असून त्यानंतर याच महिन्यात नवा महापौर व स्थायी समिती सभापती निवडला जाऊन प्रशासक कारभार संपून तो लोकप्रतिनिधींच्या हाती येणार आहे.त्यातून सध्याचे प्रभारी प्रशासक तथा आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली होण्याची शक्यता असून नवे आयुक्त कोण याची उत्सुकता आहे.
२०१७ च्या गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर सध्या राज्याचे निवडणूक आयुक्त असलेले दिनेश वाघमारे यांना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त़ म्हणून ३ मे २०१६ रोजी फडणवीस यांनी आणले.त्यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या मागे चौकशीचा भुंगा लावला.दरम्यान,आषाढी वारीत देण्यात आलेल्या मुर्त्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप राष्ट्रवादीवर झाला.त्यातून त्यांची २०१७ च्या निवडणुकीत सत्ता गेली. भाजप प्रथमच सत्तेत आली.त्यानंतर काही दिवसांतच २३ एप्रिल २०१७ रोजी वाघमारेंची राज्याच्या समाज कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली.तशीच बक्षीसी यावेळीही हर्डीकरांना दिली जाईल,अशी चर्चा आहे.सध्या त्यांच्याकडे महामेट्रो ची जबाबदारी असल्याने ते पिंपरी महापालिकेचे प्रशासक म्हणून बहूतांश कारभार ऑनलाईन पाहत होते.स्थायी समितीच्या सभा सुद्धा ऑनलाईन घेत होते. परंतू,आता सभागृह अस्तित्वात येणार असल्याने कायम व पूर्णवेळ आयुक्त लागणार आहेत.त्यामुळे प्रभारी तथा पार्टटाईम आयुक्त तथा प्रशासक हर्डीकरांची बदली होण्याची शक्यता आहे.तसे सुतोवाच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही यापूर्वीच केले आहे.महापालिका निवडणूक संपताच नवे आयुक्त शहराला मिळतील,असे ते म्हणाले आहेत.त्यामुळे नवे आयुक्त कोण असणार याकडे आता लक्ष आहे.
२०१७ ला वाघमारेंची बदली झाल्यानंतर फ़डणवीसांनी हर्डीकरांना नागपूर आयुक्त पदावरून पिंपरीत आयुक्त म्हणून आणले होते.ते पावणेचार वर्षे या पदावर राहिले.नंतर १२ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची पुण्यात नोंदणी महानिरीक्षक म्हणून बदली झाली.तेथून ते सध्याच्या मेट्रोच्या महाव्यवस्थापक पदावर गेले होते.दरम्यान,७ ऑक्टोबर रोजी पिंपरी महापालिका प्रशासक शेखरसिंह यांचीही पावणेचार वर्षानंतर नाशिक कुंभमेळा आयुक्त बदली झाली.त्यानंतर पिंपरी महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी हर्डीकर यांच्याकडे १० ऑक्टोबर २०२५ रोजी तात्पुरती देण्यात आली.ते गेले तीन महिने प्रभारी प्रशासक तथा आयुक्त आहेत.पण,आता कायमस्वरुपी आयुक्तांची महापालिकेला गरज आहे.त्यामुळे आपल्या विश्वासातील हर्डीकरांनाच पु्न्हा ही संधी फडणवीस देतात की नवा चेहरा आणतात,याकडे शहराचे लक्ष लागले आहे.जर,हर्डीकरांना कायम आयुक्त केले,तर महामेट्रो ची जबाबदारी दुसऱ्या ज्य़ेष्ठ आयएएस अधिकाऱ्याकडे सोपवावी लागणार आहे.पण,ती शक्यता कमी दिसते आहे.

