बहूमताचे श्रेय शहराध्यक्षांनी दिले सहा महिन्यांच्या अविरत पक्षबांधणीलाही
उत्तम कुटे
पिंपरीःनुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने बहूमताने सत्ता राखलीच नाही,तर गेल्या वेळेपेक्षा सात नगरसेवक जास्त निव़डून आणले.२०१७ ते २०२२ या सत्ताकाळात केलेल्या विकासामुळे पुन्हा सत्तेत आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.त्याजोडीने पक्ष संघटनेचाही त्यात मोठा वाटा राहिला.गेले सहा महिने संघटना बांधणी केल्याने जिंकलो, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांनी आज आपला आवाज ला दिला.ते अध्यक्ष झाले अन आठ महिन्यांतच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेत आला,हे विशेष.
गेल्यावेळी २०१७ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसची शहरातील १५ वर्षाची सत्ता गेली तथा भाजपाने ती घालवली,ते प्रथमच सत्तेत आले. त्यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष हे चिंचवडचे पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप होते.१२८ सदस्य संख्येच्या त्यांच्या पक्षाचे ७७ नगरसेवक त्यावेळी निवडून आले.त्यातील सर्वाधिक लक्ष्मणभाऊंनी आपल्या मतदारसंघातून ते निवडून आणले होते.यावेळी विजयी झालेल्या भाजपाच्या ८४ जणांत सर्वाधिक ३९ हे चिंचवड चेच आहेत.त्यातून जगताप कुटुंबाचा करिष्मा चिंचवडसह शहरावरही कायम असल्याचे दिसले.कारण यावेळी स्वर्गीय लक्ष्मणभाऊंचे लहान बंधू शंकर जगताप हे चिंचवडचे आमदार आहेत.ते व त्यांचे शहरातील इतर तीन सहकारी भोसरीचे आमदार महेश लांडगे,विधानपरिषदेतील आमदार उमा खापरे, अमित गोरखे,माजी खासदार अमर साबळे,शहराध्यक्ष बापू काटे ,त्यांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी आपापला वाटा या विजयात उचलला.
मे २०२५ मध्ये बापू काटे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली.त्यानंतर ऑगस्ट २०२५ च्या शेवटास त्यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली.त्यानंतर पाच महिन्यात पक्ष शहरात सत्तेत आला,हे विशेष. नवे अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीचाही हा पायगुण असल्याची चर्चा यानिमित्ताने ऐकायला मिळाली.तर,काटे यांनी सहा महिने सतत सुरु असलेल्या पक्ष संघटना बांधणीमुळेही सत्ता कायम राखण्यात आणि ती वाढण्यात मदत झाल्याचे सांगितले.या काळात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचवल्या,दोनशे वेगवेगळे कार्यक्रम घेतले,त्याचा फायदा झाला,असे ते म्हणाले.दुसरीकडे तिकिट वाटप नवा,जुना असे व्यवस्थित केले,त्यातून निर्माण झालेली थोडी नाराजीही लगेच दूर केली,परिणामी पुन्हा बहूमत मिळाले,असे काटेंनी सांगितले.
