भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी हा विजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना केला समर्पित
प्रतिनिधी
पिंपरी:पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा सलग दुसऱ्यांदा बहूमताने काल सत्तेत आली.त्याचा जल्लोष येथील पक्ष कार्यालयासमोर आज करण्यात आला.यावेळी या निवडणुकीचे प्रचारप्रमुख व पक्षाचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी आगामी काळात नागरिकांचा हा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले.त्यांना विकासाचे व्हिजन मान्य आहे,असे ते म्हणाले.शहराच्या सर्वांगीण,शाश्वत विकासासाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
१२८ जागांपैकी ८४ जागांवर भाजपा विजयी झाला.त्याचा जल्लोष मोरवाडीतील पक्ष कार्यालयासमोर करण्यात आला.
यावेळी बोलताना या निवडणुकीत भाजपाने मांडलेले विकासाचे व्हिजन,पायाभूत सुविधांचा विस्तार,सक्षम नागरी सुविधा,स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पारदर्शक प्रशासन यांना मतदारांनी पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले,असे,आ.जगताप म्हणाले, आहे.मतदारांनी विकासाला प्राधान्य देत भाजपच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केल्याने हा विजय त्यांचा आहे,अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या जल्लोषात विधान परिषदेचे शहरातील आमदार अमित गोरखे,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे,प्राधिकरणाच माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, विजय फुगे आदी सहभागी झाले होते.
महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित
स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला हा महाविजय स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित आहे,असे भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे म्हणाले.हा स्पष्ट कौल हा विकासकामे,प्रामाणिक प्रशासन,जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे,असे ते म्हणाले.पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता,पदाधिकाऱी आणि नेत्याने प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा सन्मान असून त्यांनी घराघरात जाऊन केलेला संवाद,लोकांत निर्माण केलेला विश्वास आणि संघटनात्मक ताकदीमुळेच हे यश शक्य झाले,असे ते म्हणाले.जनतेने दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने जपला जाईल,असे सांगत विकासकामांचा वेग वाढवून शहराला देशातील आदर्श शहर बनवण्याचा संकल्प भाजपा निश्चितपणे पूर्ण करेल,असा दावा त्यांनी केला.विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना हा विजय चपराक आहे, असा टोला त्यांनी लगावला.भाजपा आणि शिवसेना एकत्र आल्यास 91 जागा होतील,असे सांगत आ.लांडगे यांनी शिवसेनेशी महापालिकेत युती होण्याचे संकेत दिले.
