शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील तलाठी प्रमिला वानखेडेला सात हजाराची लाच घेताना पकडले

प्रतिनिधी
पिंपरीःशेतातील माती विकत असल्याच्या तक्रारीत कारवाईची भीती दाखवून शिरसगाव काटा (ता.शिरूर,जि.पुणे) येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी प्रमिला नागेश वानखेडे (वय 42,रा.फ्लॅट नंबर 404,तक्षशिला सोसायटी,ए विंग, पठारे ठुबेनगर,खराडी,पुणे)हिला सात हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले.तिने प्रथम दहा हजारांची लाच मागितली.नंतर सात हजारावर तडजोड केली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनीटची नवीन वर्षातील ही तिसरी कारवाई आहे.

यासंदर्भात 56 वर्षीय शेतकऱ्याने एसीबी कडे तक्रार दिली होती.त्यानुसार त्यांचे पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे व पथकाने सापळा लावून वानखेडेला नाव्हरा-तळेगाव रोडवरील छत्रपती संभाजीराजे चौकात लाच घेताना पकडले.तक्रारदार यांची शिरसगाव काटा येथे वडिलोपार्जित जमीन असून ती त्यांच्या वडीलांनी तोंडी वाटप करून दिलेली आहे.तिची लेवल ते करीत असताना त्यांच्या भावाने ती थांबवली.वाटणीप्रमाणे रेकॉर्ड झाल्यावर लेवल कर असे सांगितले.त्यानंतर ९ जानेवारी रोजी त्यांच्या शेतावरील घरी आऱोपी तलाठी वानखेडे गेली.तुम्ही माती विकत असल्याची तक्रार आल्याचे सांगत तुमच्या शेताचा पंचनामा करायचा आहे,असे म्हणाली.याबाबत तलाठी कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले.त्यानुसार १२ तारखेला तलाठी कार्यालयात तक्रारदार गेले असता तुमच्या बाजूने पंचनामा करते असे म्हणून दहा हजार लाचेची मागणी तलाठी महिलेने केली.नंतर 16 तारखेला सात हजारावर तडजोड केली होती.याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गु्न्हा तलाठी वानखेडेविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.