आपल्या चांगल्या कामांमुळे त्यांचा रागराग होतोय,फडणवीसांचा अजितदादांवर निशाणा

त्यांच्याकडे सांगायला कामे नसल्याने ते आऱोप करून निवडणूक वादाची करू पाहताहेत

उत्तम कुटे
पिंपरीःभाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाच वर्षाच्या सत्ताकाळात काय केले अशी विचारणा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार महापालिका निवडणूक प्रचारात वारंवार करीत आहेत.त्यांनी फक्त भ्रष्टाचार केला,श्रीमंत महापालिकेला कर्जबाजारी केले असा आरोपही त्यांनी केला आहे.त्याला जोरदार उत्तर भाजपचे शहरातील भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दिल्याने या दोन दादांतील संघर्षाने सध्या टोक गाठलेले आहे.त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शहर दौऱ्यातील आपल्या प्रचार सभेत आपण केलेल्या चांगल्या कामांमुळे त्यांचा रागराग होत असल्याचा टोला नाव न घेता अजितदादांना लगावला.तसेच रागावू नका,असा महेशदादांना सल्ला देत आपण केलेली कामे जनतेला सांगितली,तर कोणाला उत्तर देण्याची वेळ आपल्यावर येणार नाही,असा सल्ला आकुर्डीच्या विठ्ठल मंदिर परिसरातील सभेत दिला.त्यांच्या या उपदेशामुळे या दोन्ही दादांतील वाद किमान महेशदादांकडून आणखी वाढणार नाही,अशी शक्यता निर्माण झाली आहे.

mostbet

निवडणूक आली की काहींना कंठ फुटतो,असे म्हणत त्यांच्याकडे सांगायला कामे नाहीत आणि दुसरीकडे त्यांना त्याबाबत प्रश्न विचारले जात असल्याने ते या निवडणुकीला वादाचे स्वरुप देऊ पाहत आहेत,असे फडणवीस अजितदादांचे नाव न घेता म्हणाले.आपण कोणावर टीका करायची गरज नाही,तर फक्त केलेल्या कामाची आठवण करून द्या,असे त्यांनी महेशदादांना सांगितले.तसेच जे लोक विचारताहेत की पाच वर्षात काय केले,तर त्यांना सांगा की शहर या काळात स्वच्छतेमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकांवर,तर देशात सातव्या नंबरवर नेले,कचऱ्यापासून वीज निर्मिती, शास्तीकर माफी,साडेबारा टक्के परतावा आदी कामे केली .शिवाय मेट्रोचा चाकण पर्यंत विस्तार,नदी सुधार आदी कामेही करणार असल्याचे सांगितले.शहराला भेडसावणाऱ्या रेड झोनच्या ज्वंलत व गंभीर प्रश्नावर महिन्याभरात सकारात्मक निर्णय़ होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे,तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही,असे सांगत फडणवीसांनी महिला मते या निवडणुकीतही आकर्षित करण्याचा प्रयत्न यावेळी केला.लाडक्या बहि‍णींना लखपती दीदी योजनेचा लाभ देत त्यांना लखपती करा असे आवाहन त्यांनी आपल्या शहरातील आमदारांना केले.गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा यावेळी निवडून येतील,असा दावा केला.त्यांच्या अगोदर आ.लांडगेंनी आपल्या भाषणात एसआरए च्या कामात धमक्या येत असल्याचे सांगितले होते.त्यावर पोलिस योग्य़ ती कारवाई करतील,धमक्या देणाऱ्यांना जागा दाखवतील,असे असे गृहखाते असलेले मुख्यमंत्री म्हणाले.१६ ताऱखेनंतर त्यांचं काय करायचं ते ठरवू,असा इशारा त्यांनी दिला. तोपर्यंत १५ तारखेला फक्त कमळाची चिंता करा,पुढची पाच वर्षे तुमची चिंता आमच्यावर सोडा,असा शब्द त्यांनी दिला.

तत्पूर्वी आ.लांडगे यांनी महायुतीत सन्मान आणि आदर फक्त भाजपनेच ठेवायचा का देवाभाऊ,अशी विचारणा केली.त्यांच्या व माझ्या उंचीची बरोबरी होऊ शकत नाही,तसेच माझी त्यांच्यावर टीका करण्याची माझी कुवतही नाही,असे ते अजितदादांचा नामोल्लेख टाळून म्हणाले.पण,ते माझ्यावर शिंतोडे उडवितच राहिल्याने मी त्यांना उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.महापौर भाजपचाच होणार असा दावा त्यांनी केला.देवाभाऊंनी उद्योगनगरीला स्मार्ट सिटी केल्याचे सांगत आता तिला मेट्रो सिटी करण्यासाठी भाजपला विजयी करा,असे आवाहन भाजपचे या निवडणुकीचे प्रमुख आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी यावेळी केले. विकसित झाल्याशिवाय शहर थांबणार नाही,असे ते म्हणाले.नदीची लाल व निळी पूररेषा आणि प्राधिकरणातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्डचा विषय त्यांनी मांडला.त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नंतर आपल्या भाषणात दिले.विधान परिषद आमदार उमा खापरे,अमित गोरखे,भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे,संघटन सरचिटणीस अॅड मोरेश्वर शेडगे,तसेच राहूल कलाटे,सदाशिव खाडे,राजेश पिल्ले आदी यावेळी व्यासपीठावर होते.