प्रचाराच्या शेवटच्या टप्यात लाखोंची रोकड आणि तस्करीच्या दारूचा मोठा साठा जप्त

लाखोंची दमणची स्वस्त दारू पिंपरीत,तर १५ लाखांची रोकड पिंपळे सौदागरला पकडली

प्रतिनिधी
पिंपरीःमहापालिका निवडणुकीचा प्रचार पिंपरी-चिंचवडमध्ये शेवटच्या टप्यात मोठ्या रंगात आला आहे.त्याचवेळी या निवडणुकीतील पहिली आणि मोठी १५ लाखांची रोकड पिंपळे सौदागर येथे पोलिसांनी काल पकडली.कालच पिंपरीत लाखो रुपयांची तस्करीची दारूही राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या मदतीने जप्त केली.रोकड आणि दारू निवडणुकीत वाटण्यासाठी आणल्याचा संशय आहे.दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशात अतिशय स्वस्त मिळणारी दारू (व्हिस्की) चोरट्या मार्गाने प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणली असल्याचा आरोप ती जप्त करण्यात आलेल्या प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी आपला आवाज शी बोलताना केला.

mostbet

दारु पकडण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जी कार्यालय,एसएसटी पथक,पिंपरी पोलिसांनी प्रभाग २१ मधील पिंपरीत तपोवन मंदिराजवळ केली.दमणहून बेकायदेशीररीत्या आणलेली ही ११२.३२ बल्क लिटर (११ बॉक्स) विदेशी दारू आणि तिच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले एक चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख २० हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,वाहनातून दारू घेऊन आलेले आऱोपी वाहन सोडून पळून गेले.याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादीचे प्र.२१ मधील उमेदवार डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. निवडणूक आयोग तसेच पोलिसांना त्यांनी त्याची माहिती दिली.या नकली दारुमुळे कांड झाले असते,तर त्याला कोण जबाबदार असा सवाल त्यांनी केला.

दुसरी कारवाई सांगवी पोलिस व भरारी पथकाने कुंजीर चौक,पिंपळे सौदागर येथे केली. तेथे १४ लाख ९३ हजार चारशे रुपयांची रोकड पकडली.योगेश आप्पा जाधव (वय ४५,रा.मुस्ताक मदार, साई चौक,जनवाडी,पुणे)या पुण्यात राहणाऱ्या डिलिव्हरी बॉय कडे ती मिळाली हे विशेष.त्यात भारतीय रुपयासह थायलंड,व्हिएतनाम व दुबई या देशांतील चलनाचाही समावेश आहे.या रकमेचा हिशोब न दिल्याने ती जप्त करण्यात आल्याचे ही कारवाई केलेल्या सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी आपला आवाज ला सांगितले.निवडणूक काळात बेकायदेशीर रोख व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.