पिं.चि.मनपा निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी नाही,तर महेशदादा, अजितदादा संघर्ष कसा, कशासाठी?

उत्तम कुटे

पिंपरी:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुती होणार नसून शहरातील भाजपचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे व राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यातच ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याने या दोन दादांत संघर्ष होण्याची शक्यता आपला आवाज ने यापूर्वीच व्यक्त केली होती.ती तंतोतंत खरी ठरली.कारण या दोन दादांतील लढाई निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात टोकाला गेली असून त्यातून ते एकेरीवरही आले आहेत.हा संघर्ष पुढे काय स्वरुप घेतो याकडे आता लक्ष लागले आहे.पिंपरी महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यात महेशदादा,तर गेलेली ती पुन्हा मिळविण्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा राहणार असल्याने त्यातूनच या दोन दादांत संघर्ष निर्माण झाला असून त्याने आता परिसीमा गाठली आहे.

mostbet

गेल्या वेळी पिंपरी नाही,तर पुणे महापालिकेतील सुद्धा राष्ट्रवादीची सत्ता भाजपने हिसकावून घेतली.त्यामुळे आपल्या होमटाऊन जिल्ह्यातील या दोन्ही महापालिकांवर पुन्हा कब्जा करण्याचा चंग अजितदादांनी बांधलेला आहे.त्यातही त्यांचे अधिक लक्ष पिंपरी महापालिकेवर आहे.त्यासाठी ते पुण्यात तळ ठोकून असून वरचेवर पिंपरी-चिंचवडचा दौरा करीत आहेत.पुण्यापेक्षा त्यांनी पिंपरीत भाजपच्या कारभाराला व त्यातही त्यांचे कारभारी आ.लांडगेंना आपले लक्ष्य केले आहे.राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील श्रीमंत पिंपरी महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केला,तिला कर्जबाजारी केले,असा हल्लाबोल अजितदादांनी लावून धरला आहे. त्यावर पहिल्यांदा शांत राहिलेल्या महेशदादांनी दुसऱ्या वेळीही ही टीका होताच मात्र जोरदार प्रतिहल्ला केला. अजितदादा नैराश्येतून आरोप करीत असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोट ठेवले. त्यातून वाचण्यासाठी ते भाजपच्या सत्तेत सामील झाल्याचे सांगितले.तेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा आका असल्याची तोफ डागली.त्यांचा मुलगा पार्थ याच्या कंपनीने पुण्यातील जमिन लाटल्याच्या प्रकरणालाही त्यांनी पुन्हा उजाळा दिला.त्यानंतरही अजितदादांचा टीकेचा सूर न नरमल्याने महेशदादा आणखी आक्रमक झाले.आम्ही बांगड्या भरल्या नसल्याचे सांगत ते थेट अजितदादांना नडले.त्यांना आव्हान दिले.त्यातून या दोघांतील कोल्ड वॉर प्रत्यक्षात सुरु झाले.

तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो,मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? असा अजितदादांचा एकेरी उल्लेख करत तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील,असे आव्हान महेशदादांनी आता दिले आहे. आमच्या नादी लागू नको,असा इशारा देण्यास ते विसरले नाहीत.जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत,ते पिंपरी चिंचवडचे होतील का असा सवाल केला. या दोन दादांचे पदाधिकारी,समर्थक व पक्षही त्यांच्या लढाईपासून चार हात सुरक्षित अंतर राखून आहेत,हे उल्लेखनीय. तसेच अजितदादा हे भाजपा व त्यांच्या इतर आमदार,नेत्यांवर आरोप करीत नसून फक्त महेशदादांनाच त्यांनी आपल्या रडारवर घेतले आहे,,हे विशेष.तसेच हे दोघेही लेकी बोले, सुने लागे अशा पद्धतीनेच एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असून एकमेकांचे थेट नाव घेणे टाळत आहेत. त्याबाबत अजितदादांना काल विचारले असता त्यावर समाधानकारक उत्तर त्यांनी दिले नाही.परंतू,पैलवान महेशदादा हेच आपल्याला धोबीपछाड देऊ शकतात, याची ठाम खात्री पटल्याने त्यांना अजितदादांनी लक्ष्य केले असल्याचे समजते.दुसरीकडे पैलवान आ.लांडगे हे ही आता महापालिका प्रचारात जोरात उतरले आहेत. जेथे जेथे अजितदादांनी शहरात सभा घेतल्या,तेथे ते सभा घेत आहेत,ज्या प्रभागात अजितदादा प्रचाराला गेले तेथे ते जात आहेत.त्यातून या दोन दादांतील संघर्ष आणखी टोक गाठत असून त्याला प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गंभीर वळण मिळण्याची भीती पोलिसांना आता वाटू लागली आहे.त्यामुळे प्रचाराच्या ते अधिक काळजी घेताना दिसत आहेत.