दोन्ही उपमुख्यमंत्र्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आता पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक प्रचाराला

महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराच्या अजितदादांच्या आरोपावर काय बोलणार याकडे लक्ष

प्रतिनिधी
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राज्याच्या सत्तेतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यातही तेथील सत्ता टिकविण्यासाठी भाजपने,तर ती पुन्हा मिळवण्याकरिता राष्ट्रवादीने जोरदार कंबर कसली आहे.त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजित पवार हे शहरात जणू काही तळ ठोकून बसले आहेत.तर,दुसरे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आज (ता.९) शहरात प्रचारासाठी येऊन गेले.त्यानंतर आता भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उद्या (ता.१०) प्रचारासाठी उद्योगनगरीत येत आहेत.ते जाहीर सभा घेणार असल्याचे भाजपचे शहरातील विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आज सांगितले.

mostbet

फडणवीसांची जाहीर सभा उद्या दुपारी अडीच वाजता आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात होणार आहे.ते यावेळी पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या सभेला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे. फडणवीसांच्या उपस्थितीमुळे शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांची सभा या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे,असे आ.गोरखे म्हणाले.त्यासाठी पक्षाचे निवडणूक प्रमुख तथा चिंचवडचे आमदार शंकर जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे,शहरातील विधान परिषद सदस्या उमा खापरे यांच्यासह पक्षाचे अधिकृत उमेदवार,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या टर्म मध्ये २०१७ ते २०२२ या काळात पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता होती.त्या काळात त्यांनी मनपा पोखरून खाल्ली,मोठा भ्रष्टाचार केला,अशी तोफ अजितदादा या निवडणूक प्रचारात वरचेवर डागत आहेत.त्यातही त्यांनी आ.लांडगे यांना त्याकरिता त्यांनी आपल्या रडारवर घेत त्यांनाच लक्ष्य केलं आहे.दुसरीकडे शहरातील भाजपचे इतर आमदार जगताप,गोरखे,खापरे यांना,मात्र त्यांनी सोडल्याने त्याची चर्चा आहे.दुसरीकडे फडणवीसांच्या एकदम मर्जीतील आ.लांडगेंनाच अजितदादांनी टार्गेट केल्याने उद्याच्या सभेत मुख्यमंत्री काय बोलतात,अजितदादांना नाव न घेता आपल्या निशाण्यावर घेतात का याची मोठी उत्सुकला शहरवासियांना लागली आहे.