पिंपरीसह राज्यातील २९ महापालिकांत राष्ट्रवादीच्या विरोधात डॉ.कांबळे काम करणार
प्रतिनिधी
पिंपरीःगेली २५ वर्षे राष्ट्रवादीसाठी काम करणारे कष्टकरी,रिक्षा चालक व असंघटित कामगारांचे नेते डॉ.बाबा कांबळे यांनी भाजपाला काल रात्री पाठिंबा जाहीर केला.भाजपात जायचे की कसे याचा निर्णय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा करून घेणार असल्याचे त्यांनी आपला आवाज ला थोड्या वेळापूर्वी सांगितले.ते अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग ९ अ मधून इच्छूक होते.पण,तेथे स्थानिक आमदार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पूत्र सिद्धार्थ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने डॉ.कांबळे यांच्या समर्थक महिलांनी अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ घातला होता. दरम्या,त्यांच्या या पावित्र्यामुळे सिद्धार्थ यांच्यासह राज्यात राष्ट्रवादीच्या अडचणीत थोडी का होईना भर पडली आहे.
कष्टकऱ्यांचे स्वतंत्र आणि लढाऊ नेतृत्व अजित पवारांना नको आहे,असा आरोप डॉ.कांबळे यांनी पिंपरीतील सभेत अजितदादांवर काल रात्री केला.राज्यातील 29 महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार असल्याचे जाहीर केले. “प्रस्थापित नेत्याच्या मुलासाठी” आपला राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला,सर्व बाजूंनी कोंडी करण्यात आली,अशा कठीण काळात आमदार लांडगे यांनी मदतीचा हात पुढे केला,असे ते म्हणाले.त्यामुळे रिक्षा चालकांसह कष्टकरी संघटनांचे सदस्य राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाहीत,असे त्यांनी जाहीर केले.कालच्या शहर प्रचार दौऱ्यात अजितदादा हे दुपारी डॉ.कांबळेंशी चर्चा करणार होते.पण,त्यापूर्वीच त्यांनी भाजपाचे व्यासपीठ गाठले आणि त्यांना पाठिंबा दिला.

