प्रतिनिधी,
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात येऊ लागल्याने त्याला आता मोठा वेग आला आहे.प्रभाग १५ मधील भाजप उमेदवारांनी काल (ता.७) सायंकाळी भव्य पदयात्रा काढून आपल्या प्रचाराला मोठी गती दिली.त्यात राजू मिसाळ,अमित गावडे,शैलजा मोरे आणि शर्मिला बाबर हे उमेदवार सहभागी झाले.
निगडी प्राधिकरणातील आकुर्डी सेक्टर २७-ए परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली.त्यात मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक तसेच भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी सर्व उमेदवारांनी परिसरातील मंदिरांमध्ये दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली.नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत शुभेच्छा दिल्या.विकासकामांसाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.
या पदयात्रेत प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले अतुल इनामदार आणि विजय शकर यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.उमेदवारी न मिळाल्याने नाराज असतानाही त्यांनी पक्ष शिस्त पाळत भाजप नेतृत्वाच्या आदेशानुसार अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाच नाही,तर ते त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभागीही झाले.त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजप व त्यांच्या उमेदवारांची ताकद वाढल्याचे चित्र दिसले.
स्थानिक प्रश्न,नागरी सुविधा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाबाबत नागरिकांनी आपली मते यावेळी उमेदवारांसमोर मांडली. त्यावर येत्या काळात समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी बोलून दाखवला.या पदयात्रेमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले असून नागरिकांचा मोठा पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

