उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष या कारणामुळे नाहीत आखाड्यात
उत्तम कुटे
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत महायुती नाही.आघाडीतही थोडी बिघाडी होऊन शरद पवार गट बाहेर पडला असून त्यांच्या जागी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री झाली आहे.दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीतील सहा राजकीय पक्षांपैकी चार पक्षांचे शहराध्यक्ष तथा शहर प्रमखांपैकी चार रिंगणात असून दोन,मात्र नाहीत.निवडणूक लढणाऱ्या चौघांपैकी दोघांचा विजय नक्की असल्याची चर्चा असली,तर चौघांचाही विजयाचा चौकार बसतो का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
भाजप, राष्ट्रवादी या महापालिकेतील दोन्ही माजी सत्ताधाऱ्यांच्या शहराध्य़क्षांसह,शिवसेना,मनसेचे शहरप्रमुख निवडणूक लढवित आहेत.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष,माजी महापौर आणि गतवेळचे नगरसेवक योगेश बहल हे विशाल थिएटर,एच.ए. कॉलनी,कासारवाडी,संत तुकारामनगर या प्रभाग २० मधील ड या सर्वसाधारण जागेतून निवडणुकीच्या आखाड्यात असून ते त्यांच्या पॅनेल चेही प्रमुख आहेत.भाजपचे शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे हे शिवार गार्डन,कापसे लॉन,पिंपळे सौदागर, रोजलॅण्ड या प्रभागातून (क्रमांक २८) नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी साठी राखीव अ जागेवर उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने उमेश काटे यांना उमेदवारी दिली आहे.तर,याच प्रभागात राष्ट्रवादीचे नाना काटे हे सर्वसाधारण तथा ओपन ड जागेतून रिंगणात असून त्यांच्यासमोर संदेश काटे भाजपचे आहेत.म्हणजे २८ क्रमाकांच्या प्रभागातील अ व ड जागेवर तेथे काटे विरुद्ध काटे अशीच लढत होत असली,तरी राष्ट्रवादी व भाजपच्या मातब्बर नाना व बापूंनी समोरासमोर उभे राहण टाळले आहे.ते दोघेही गत टर्मला नगरसेवक होते. ही बाब यावेळी त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे.नानांच्या पत्नी व गतवेळच्या नगरसेविका शीतल काटे या सुद्धा याच प्रभागातील सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित अ जागेवरील उमेदवार आहेत.
शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस हे वाल्हेकरवाडी,विकासनगर,किवळे,रावेत या प्रभाग १६ मधील सर्वसाधारणच्या ड जागेतून लढत आहेत.तर,मनसे चे शहरप्रमुख सचिन चिखले हे निगडी गावठाण-सेक्टर २२ ओटा स्कीम, यमुनानगर, साईनाथनगर या प्रभाग १३ च्या ड या सर्वसाधारण जागेवर उमेदवार आहेत.ते गेल्या वेळी नगरसेवक होते.त्यांचा सामना गत टर्मचे भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळेंसह इतर नऊ उमेदवारांशी होणार आहे.आरक्षणात बदल झाल्याने या प्रभागातील दोन ठिकाणच्या नगरसेवकांना एकाच जागेव लढण्याची पाळी आली आहे.तर,निवडणुकीच्या तोंडावर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांचे बंधू सदगुरु यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली.परिणामी नैतिक जबाबदारी घेत कैलास कदम यांना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा तडकाफडकी द्यावा लागला.त्यामुळे माजी विरोधी पक्षनेते राहिलेले कैलास कदम यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात नाहीत.तर, उबाठा शिवसेनेचे प्रभारी शहरप्रमख संजोग वाघेरे यांनी सु्द्धा ऐन निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला.त्यांच्या पत्नी आणि गतवेळच्या माजी नगरसेविका उषा वाघेरे या भाजपच्या उमेदवार असल्याने ते रिंगणात नाहीत.राष्ट्रवादीत असताना त्यांनी शहराचे महापौरपद भुषविलेले आहे.ते,निवडणूक लढवित नसले, तरी त्यांच्या पत्नी त्या लढवित आहेत.तसेच कैलास कदम उमेदवार नसले,तरी त्यांचे बंधू आहेत.

