महेश लांडगेंना स्थायी समितीचे सभापती या कारणासाठी केलं होतं,असा केला प्रथमच गौप्यस्फोट
प्रतिनिधी
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आणि भाजपचे महेशदादा लांडगे या दोन दादांतच होणार अशी बातमी आपला आवाज ने दिली होती.ती पूर्ण खरी ठरते आहे.कारण या दोन दादांत सध्या आरोप,प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी या निवडणुकीच्या प्रचारात झडत आहेत.मंगळवारी (ता.६)दुपारी आकुर्डीतील सभेत महेशदादांनी अजितदादांना डिवचले.त्याची सव्याज परतफेड अजितदादांनी लगेचच सायंकाळी पिंपरीगावातील जाहीर सभेत केली.भ्रष्टाचार दादागिरीतून प्रचंड प्रॉपर्टी जमवल्याचा आरोप त्यांनी महेशदादांवर नाव न घेता केला.२ तारखेला पिंपरीत पत्रकारपरिषदेत केलेले भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा केले.हा कलगीतुरा प्रचाराच्या शेवटच्या टप्यात आणखी रंगण्याची दाट चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर भाजप नाही,तर त्यांचे भोसरीचे आमदार महेश लांडगे हेच असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.चार दिवसांपूर्वीच (ता.२)त्यांनी पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने पाच वर्षाच्या सत्ताकाळात महापालिका पोखरून खाल्ली,श्रीमंत मनपा ला कर्जबाजारी केले, असा हल्लाबोल केला होता.त्यांचा रोख हा भाजपचे शहराचे कारभारी आ.लांडगेंकडे होता.आज पुन्हा त्यांनी नावाचा उल्लेख न करता आ.लाडगेंना पुन्हा आपल्या निशाण्यावर घेतले.दादागिरी व भ्रष्टाचारातून त्यांनी प्रचंड प्रॉपर्टी जमविल्याचा घणाघाती आरोप केला.एकेरी उल्लेख करीत मी त्याला नगरसेवक केलं,स्थायी समितीचे सभापतीपद दिलं.असं सांगितलं.विलास लांडे यांच्या आमदारकी त्रास होऊ नये म्हणून हे केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.पण या पठ्यानं त्यांनाच पराभूत केलं,असे ते म्हणाले.पण,असे कितीतरी येतात,त्याचा काही मला फरक पडत नाही,असे म्हणत जोपर्यंत लाडक्या बहिणी बरोबर आहेत,तोपर्यंत मी कुणाच्या बा ला घाबरत नाही, असे आव्हान त्यांनी दिले.
पाच वर्षात मनपा च्या चाळीस हजार कोटींच्या बजेटमध्ये काय कामे केली,असा सवाल अजितदादांनी भाजप व त्यांचे शहर कारभारी महेशदादांना केला.हा जनतेचा पैसा असल्याने त्याबाबत विचारणा करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले.२०१७ मध्ये मनपा च्या ठेवी ४,८३४ कोटी होत्या.आता त्या २१२५ कोटी वर आल्या.म्हणजे ठेवी मोडून आणि कर्जरोखे उभारून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका कर्जबाजारी केली,असे ते म्हणाले.अधिकाऱ्यांवर दबाव,टेंडरमध्ये रिंग,भ्रष्टाचार अगदी कुत्र्यांच्या नसबंदीतही सुरु आहे,असा हल्लाबोल त्यांनी पुन्हा केला.कसं ओढता येईल हा यांचा एकच उद्देश आहे,असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवडकरांनी याचा विचार केला पाहिजे,असे सांगत लाडक्या बहिणींनी य़ावेळी भावनिक न होण्याचे आवाहन त्यांनी हात जोडून केले.नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागात जसा प्रतिसाद दिला,तसा तो शहरी भागात या लाडक्या भावाला महापालिकेला देण्याची त्यांनी विनंती केली.

