भाजप आमदार जगताप व शहराध्यक्ष काटेंमुळे वाकडकरांचे धरणे आंदोलन स्थगित

मैदान,सभागृह,विरंगुळा केंद्राची जागा बिल्डरला दिल्याच्या निषेधार्थ सुरु होते धरणे

उत्तम कुटे

पिंपरीःक्रीडांगण,सभागृह,उद्यान व विरंगुळा केद्रासाठी मागणी केलेला कस्पटे वस्ती,वाकड येथील प्राधिकरणाचा भूखंड बिल्डरला दिल्याच्या निषेधार्थ वाकडकरांनी परवापासून (३० नोव्हेंबर)धरणे आंदोलन सुरु केले होते.त्यात स्थानिक भाजप आमदार चिंचवडचे शंकर जगताप व या पक्षाचे शहराध्यक्ष शत्रूघ्न ऊर्फ बापू काटे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने काल ते मागे घेण्यात आले.दरम्यान,या जागेत वरील सुविधा देण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी गत लविधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तेथेच झालेल्या जाहीर प्रचार सभेत दिले होते.त्यांच्याकडेच हा प्रश्न मांडणार असल्याचे जगताप व काटे यांनी सांगितल्याने वाकडकरांनी धरणे आंदोलन तूर्तास स्थगित केले.

भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या नेतृत्वात वाकडकर या आंदोलनात सहभागी झाले होते.तर,त्याला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला होता,हे विशेष.पिंपरी-चिंचवडमधील निवडणुकीच्या मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा वाकड पेठ क्र.३८/३९ या २८ एकरच्या या मोकळ्या भूखंडावर होत आहेत.गेल्या विधानसभेला चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी फडणवीसांची ती तेथे झाली होती.त्यावेळी त्यांनी या जागेवर वरील सुविधा उभ्या करण्याचे आश्वासन दिले होते.दरम्यान,प्राधिकरणाने तेथील मोठा भाग विकल्याने आता हे मैदान फक्त साडेनऊ एकरचेच राहिले आहे.त्यातील साडेसात एकरात क्रीडांगण, सभागृह,उद्यान,ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र व्हावे अशी वाकडकरांची जुनी मागणी आहे.मात्र,तेथील दोन एकर जागा नुकतीच एका बिल्डरला देण्यात आली.तेथे त्याने बांधकाम सुरु करताच वाकडकरांनी लगेच हे धरणे आंदोलन सुरु केले होते.मात्र,याप्रश्नी स्थानिकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देऊ असे आश्वासन आ.जगताप व काटे यांनी दिल्याने तूर्तास वाकडकरांनी आपले हे आंदोलन काल स्थगित केले.

लक्ष्मणभाऊ जगताप आमदार होते,तेव्हापासून वाकडच्या या मोकळ्या जागेत क्रीडांगण,सभागृह व विरंगुळा केंद्राची मागणी असल्याचे कस्पटे यांनी आपला आवाज ला सांगितले.तेथील २८ एकरातील १५ एकर जागा पोलिस आयुक्तालयाला देण्यास आम्ही विरोध केला नाही,याकडे लक्ष वेधत आता,मात्र त्यातील दोन एकर ही बिल्डरला दिल्याने स्थानिकांनी त्याला क़़डाडून विरोध करीत लगेच उत्स्फूर्तपणे हे आंदोलन सुरु केले होते,असे ते म्हणाले.वाकडकरांच्या हक्कासाठी ते असल्याने त्याला पाठिंबा दिल्याचे आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.फडणवीसांनी सत्ता मिळताच दिलेले आश्वासन मोडले,असा आरोप त्यांनी केला.हा भूखंड विक्रीचा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.