मात्र,त्याने इतर गुन्ह्यांची माहिती दडविल्याने तो आता उशीराने केला रद्द
उत्तम कुटे
पिंपरीः गेल्या महिन्याच्या सात तारखेला पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त (सीपी) विनयकुमार चौबे यांनी शस्त्रांचा गैरवापर केल्याने त्याचे परवाने रद्द केले होते.ही कडक कारवाई या महिन्यातही त्यांनी सुरुच ठेवली.एका दिवसात आणखी दोघांचे शस्त्र परवाने रद्द करीत त्यांच्याकडील पिस्तूले जमा करून घेतली.यावर्षी २१ जुलैला चौफुला,यवत येथील अंबिका कला केंद्रात परवानाधारी शस्त्रातून गोळीबार झाल्यानंतर सीपीं नी गैरवापर होणाऱ्या शस्त्रांचा परवाना रद्दची मोहीम सुरु केली. त्यात त्यांनी यावर्षी सहाजणांचे ते रद्द केले आहेत.दरम्यान,असे परवाने देताना आता ते अधिक खबरदारीही बाळगू लागले असून प्रतिष्ठेसाठी व गरज नसतानाही तो घेऊ पाहणाऱ्या ५८ जणांचे असे अर्ज त्यांनी यावर्षी नाकारले आहेत.
चौफूल्याच्या कला केंद्रात राज्यातील सत्ताधारी महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू
बाळासाहेब मांडेकर यांनी पहिली बारी कोणाची लावायची या क्षुल्लक कारणातून गोळीबार केला होता.ज्या पिस्तूलातून त्यांनी तो केला तो त्यांचे मित्र गणपत जगताप यांचे होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या प्रस्तावानुसार आपल्या हद्दीतून जगतापांना दिलेला शस्त्र परवाना सीपी चौंबेंनी ७ नोव्हेंबरला रद्द केला.त्याच दिवशी त्यांनी बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलच दिनेश सिंग याचाही हा परवाना रद्द केला.कारण त्याने एका फार्म हाऊसवरील वाढदिवसांच्या पार्टीत आपल्याकडील परवाना धारी पिस्तूलातून गोळीबार केला होता.तर,त्याअगोदर चिखलीतील संतोष पवार आणि ताथवडे य़ेथील संतोष कदम अशा दोन संतोषचे शस्त्र परवाने सीपींनी रद्द केले होते.
चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतीलच प्रविण सुरेश लुक्कर यांचा शस्त्र परवाना आता सीपींनी रद्द केला.गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तीला तो सहसा दिला जात नाही. तरीही तो लुक्करला दिला गेला होता,हे विशेष.अर्ज करताना त्याने एक गुन्हा दाखल असल्याचे सांगितले होते,अशी माहिती पोलिसांनीच त्याचा परवाना रद्द केल्याचे सांगताना दिली.प्रत्यक्षात त्याच्यायाविरुद्ध चार गुन्हे दाखल असून त्यातील तीन निगडी पोलिस ठाण्यात,तर एक खटला न्यायालयात प्रलंबित आहे.दोन गुन्हे व एक खटला माहिती दडवली म्हणून आता लुक्करचा शस्त्र परवाना रद्द करण्यात येऊन त्याचे हत्यार पोलिसांनी जमा करून घेतल्याचे पोलिसांनी आज सांगितले.दुसरा रद्द झालेला शस्त्र परवाना हा महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुळी गावातील मयुर गुलाब सोनवणे यांचा तो आहे.त्यांच्याकडून निष्काळजीपणामुळे त्यांच्याच रिव्हॉल्वर मधुन १ राउंड फायर होवुन त्यांचे स्वतःचे डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती.त्याबाबत गुन्हा दाखल झाला.त्यात निष्काळजीपणे शस्त्राचा वापर केल्याने त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पोलीस आयुक्त कार्यालयाला दिला होता.

