बनावट मेडीक्लेम व्दारे लाखोंच्या फसवणुकीचे तळेगाव दाभाडेत मोठं रॅकेट

एकाच डॉक्टराविरुद्ध पंधरा दिवसांत दुसरा फसवणुकीचा गुन्हा झाला नोंद

उत्तम कुटे
पिंपरीःबनावट मेडीक्लेम सादर करून विमा कंपन्यांना लाखो रुपयांना गंडा घालणारे मावळ तालुक्याच्या तळेगाव दाभाडे य़ेथील श्री मल्टीपेशालिटी रुग्णालयातील मोठं रॅकेट पोलिसांनी नाही,तरखासगी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी या महिन्यात उघडकीस आणले.त्यात दोन डॉक्टरांना २३ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली.त्यानंतर आता त्यातील आऱोपी संदीप भीमराव वानखेडे (वय ४०,रा.जी-२०४,प्रतिकनगर,तळेगाव दाभाडे) या डॉक्टरविरुद्ध आणखी एक असाच दुसरा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात काल दाखल झाला.

बोगस मेडीक्लेम बनवून टाटा एआयजी कंपनीची २३ लाखांची फसवणूक केल्याबद्दल श्री मल्टीपेशालिटी या खासगी रुग्णालयाचे संचालक डॉ.वानखेडेसह डॉ.विशाल रमेशराव कुकडे (वय ४०,रा.फ्लॅट नं. ३०१,रिअर स्प्रग्ज मिडोज,वराळे-आंबी रोड,तळेगाव स्टेशन) यांच्याविरुद्ध १७ तारखेला तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फसवणूक आणि बनावटगिरीचा गु्न्हा दाखल झाला होता.त्यात त्यांनी १४ बनावट मेडीक्लेम प्रकरणे सादर करून टाटा एआय़जी कंपनीला २३ लाखांना गंडा घातला होता.तो एआय़जी..चे डॉक्टर संदीप गायकवाड यांनी उजेडात आणला.त्यानंतर या दुक्कलीतील डॉ.वानखेडेंनी बजाज जनरल इन्शुरन्स फायनान्स कंपनीला तीन लाख ६२ हजार १७९ रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण आता समोर आले आहे.त्याबाबत बजाज…चे व्यवस्थापक रोहित सुरेश खंडेलवाल (वय ३६,रा.फ्लॅट नं.बी९,अमित पार्क,संकल्प नगरी,देहूरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तळेगाव दाभाडे पोलिसांनी डॉ.वानखेडेविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा दुसरा गुन्हा काल नोंदविला.त्यात चार बोगस मेडीक्लेम डॉ.वानखेडेंनी सादर करीत तीन लाख ६२ हजारांची फसवणूक केली.यावर्षी ३ मे १० सप्टेंबरदरम्यान ती केली गेली.ती समजताच खंडेलवाल यांनी पोलिसांत धाव घेतली.त्यावर काल हा गुन्हा दाखल झाला.१७ डिसेंबरच्या बनावट मेडीक्लेम फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक खामगळ हेच कालच्या तशाच फसवणुकीचाही तपास करीत आहेत.